Tuesday, March 25, 2025

डॉलर्स

कोणत्याही देशात ‘डॉलर्स’ ही करन्सी घेऊन गेल्यास त्या त्या देशातील करन्सी सहज बदलून मिळते. ‘जागतिक चलन’ म्हणून अमेरिकन डॉलरचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

एका सहलीबरोबर गेलो होतो तेव्हा सर्वसाधारण परिस्थितीचा एक माणूस खूप सारे शॉपिंग करत होता. सामान्य परिस्थितीचा हा माणूस; परंतु याच्याकडे एवढे पैसे कसे, असे प्रत्येकालाच वाटत होते. दोन-तीन दिवस झाले असतील त्यानंतर त्यांनी मला विचारले,
“तुमच्याकडे किती डॉलर्स आहेत?”हा प्रश्न अनपेक्षित होता, त्याहीपेक्षा त्यातून त्याचा कुत्सित भाव जाणवत होता.
“माझ्याकडे डॉलर्स नाहीत फक्त जरुरीपुरता युरो मी घेऊन आले आहे.”
मी उत्तरले.

आमचे संभाषण तिथेच संपले. त्यानंतर आणखी दोन दिवसांनंतर केव्हा तरी गप्पांचा कार्यक्रम चालू होता. या माणसाने खिशातून नोटांचा गठ्ठा काढला आणि तो मोजत होता. मी पाहिले की ते डॉलर्स होते. ही चांगली संधी होती. मी त्याला विचारले,
“तुमच्याकडे इतके डॉलर्स कसे
काय आहेत?”
त्यावर त्याने एक कथा सांगितली, ती फारच रंजक आहे. तो म्हणाला की, ताज हॉटेलजवळ माझ्या मेहुण्याचे हार्डवेअरचे दुकान आहे. त्याच्याकडे एकदा एक माणूस डॉलर घेऊन आला आणि त्याने त्याला सांगितले की मी ताज हॉटेलमध्ये वेटर आहे आणि मला टीप म्हणून कोण्या फॉरेनरने ही नोट दिली आहे. या नोटेचा मला काहीच उपयोग नाही, तर मला भारतीय नोट बदलून मिळेल का?

माझ्या मेव्हण्याने तत्परतेने त्याला एक नोट दिली; परंतु स्वतःचा बराच फायदा साधून. त्याच्या हातात भारतीय नोट येताच तो आनंदाने तिथून गेला आणि मग कदाचित सोबतीच्या इतर वेटरना त्याने ही गोष्ट सांगितली असावी आणि मग सगळेच वेटर दिवसाअखेर काही नोटा घेऊन माझ्या मेहुण्याकडे डॉलर बदलायला घेऊन येऊ लागले. मुंबईत ताजमध्ये राहणारे बहुतेक फॉरेनर्सच! त्यामुळे वेटरच्या टीपवर, अगदी साईड बिझनेस म्हणून माझ्या मेव्हण्याने बरेच डॉलर्स जमा केले. आता डॉलर्स बदलून भारतीय पैसे घेणे इतके सोपे नाही कारण आपण करन्सी बदलायला गेल्यावर आपल्याला विमानाचे तिकीट, व्हिजा इत्यादींचे झेरॉक्स त्यांना सुपूर्द करावे लागते. त्यामुळे मेव्हण्याने आमच्या नातेवाइकांपैकी कोणीही कुठेही जाताना त्यांना मोठ्या प्रमाणात डॉलर्स द्यायला सुरुवात केली. ज्या किमतीत त्याला हे डॉलर्स मिळाले, त्या किमतीत त्याने आम्हाला द्यायला सुरुवात केली. त्यामुळे आमच्याकडे भरपूर डॉलर्स आहेत आणि आम्हाला ते मनसोक्त उडवायचेही आहेत.

आता या घटनेचा जेव्हा मी विचार करते तेव्हा लक्षात येते की, एखादी गोष्ट तुम्हाला स्वस्तात मिळाली किंवा फुकट मिळाली तर तुम्हाला त्याचे महत्त्व वाटत नाही. त्यामुळे डॉलर्स उडवताना त्याला टेन्शन येत नव्हते, जसे इतरांना येत होते.

आपल्याला फॉरेन ट्रिप करायच्या नसल्या तरी एका डॉलर्सचे किती भारतीय रुपये? हे मात्र पूर्वी वर्तमानपत्रातून आणि आता गुगलवरून अधूनमधून वाचतच असतो आणि कधी सहलीसाठी फॉरेनमध्ये कुठेही गेल्यावर, कोणत्याही रकमेची कोणतीही वस्तू विकत घ्यायची असेल, तर आपण युरो, डॉलर्स किंवा आणखी कोणत्याही देशातील पैसे दिले तरी भारतीय रुपयात किती असा हिशोब विचार करतोच. यूएस डॉलर रुपयापेक्षा जास्त आहे, याची विविध कारणे आहेत. अमेरिकेतून अनेक वस्तू भारत आयात करतो त्यामानाने खूपच कमी वस्तू निर्यात करतो. आयातीपेक्षा निर्यात कमी असल्यामुळे रुपयापेक्षा डॉलरचे मूल्य जास्त आहे, हे कुठेतरी वाचल्याचे आठवते. मग मनात असा प्रश्न निर्माण होतो की, भारताला किती डॉलर्सची आणि का गरज पडते? थोडे शोधकार्य केल्यावर असे लक्षात आले की कच्च्या तेलाच्या किमती, प्रति बॅरल डॉलरमध्ये मोजल्या जातात. इतर चलनाच्या तुलनेत बहुतेक देशांना आणि व्यापाऱ्यांना डॉलर्समध्ये व्यवहार करायला सोपे जाते.

कोणत्याही देशात ‘डॉलर्स’ ही करन्सी घेऊन गेल्यास त्या त्या देशातील करन्सी सहज बदलून मिळते. १९४४ च्या ब्रेटन वुड्स कॉन्फरन्सनंतरच्या काळात, जगभरातील ‘विनिमय दर’ युनायटेड स्टेट्स डॉलरच्या तुलनेत निश्चित करण्यात आले होते, ज्याची देवाण-घेवाण एका निश्चित रकमेसाठी केली जाऊ शकते. यामुळे ‘जागतिक चलन’ म्हणून अमेरिकन डॉलरचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे. एकंदरीत काय तर मला भेटलेल्या, भरपूर डॉलर्स उधळणाऱ्या सहलीतल्या सहयोगी मित्राला Dwight D. Eisenhower (उच्चार नीट जमत नाही म्हणून इंग्रजीमध्येच टाकले) यांचे एक कोट मनातल्या मनातच ऐकवले की Dollars and guns are no substitutes for brains and will power. आणि मग मनावरचा ताण कमी झाला. जगात आपणच बुद्धिवान असल्याच्या भावनेने, पुढील सहलीतला प्रत्येक आनंद क्षण उपभोगला!

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -