Tuesday, September 16, 2025

Anita Birje : ठाण्यात मेळावा संपताच ठाकरेंच्या वाघिणीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Anita Birje : ठाण्यात मेळावा संपताच ठाकरेंच्या वाघिणीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

ऐन विधानसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का

ठाणे : लोकसभेत अधिक जागा मिळूनही ठाकरे गटाचा प्रभाव वाढला नसल्याचेच चित्र आहे. आता सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटानेही ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे मेळावा आयोजित केला होता. मात्र, मेळावा संपताच उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसला. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरेंसोबत राहिलेल्या अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली. कालच हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्या, तसेच दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या सहकारी अनिता बिर्जे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “अनिता बिर्जे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल.” एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की “उबाठा गटाच्या उपनेत्या आणि आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी आज आनंदआश्रमात येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.” पुढे त्यांनी म्हटलं आहे की “शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिता बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहोचवली होती. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. त्यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करतो.” यावेळी ठाणे जिल्हा महिला संघटका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक रमाकांत मढवी, टेंभीनाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे तसेच ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा