निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
पीराना नावाच्या अज्ञात आदिवासी जमातीने १९६१ मध्ये ब्रिटिश शोधकर्ता रिचर्ड मेसन याची हत्या केली होती. हे खूप आक्रमक असतात पण तसे पाहिले तर हे आपल्याला सुद्धा खूप घाबरतात. आपण निसर्गाविरुद्ध वागत असल्यामुळे यांना ते सहन होत नाही आणि ते आपल्यालाच आक्रमक समजतात. जरी ते निसर्गाच्या सान्निध्यात असले आणि निसर्गाच्या सौंदर्याचा पुरेपूर आस्वाद घेत असले खरे तरी त्यांचे जीवन हे अतिशय दुःखदायक, खडतर आणि वेदनादायक सुद्धा आहे.
म्हणजे जगण्यासाठी त्यांना खूप धडपड करावी लागते. साप, विषारी कीटक, मगरी, विषारी फळे, फुले, वनस्पती अशांच्या सान्निध्यात त्यांना सतत राहावे लागते. या उपद्रवी जीवांचा यांना किती त्रास होत असेल बरे. हे वर्षावन असल्यामुळे येथे असणाऱ्या डास आणि कीटकांमुळे होणारे आजार जसे फ्ल्यू, मलेरिया, अस्वच्छ राहणीमान आणि वर्षा वनातील गढूळ पाणी यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोसारख्या आजारांवर औषध माहीत नसल्यामुळे आणि योग्य वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या जमातीतील अनेकांचे मृत्यू सुद्धा खूप लवकर होतात. येथील स्वदेशींची जगण्याची कला ही पूर्णपणे नैसर्गिक असल्यामुळे आणि जंगलाचे संरक्षक असल्यामुळे आपण यांच्यापर्यंत पोहोचून आपले आजार त्यांच्यापर्यंत न पोहोचविणेच चांगले. कारण या आदिवासींपेक्षा शहरातील लोकांनाच विविध प्रकारचे आजार असतात. त्यामुळे त्यांच्या अनेक जमाती नामशेष झाल्या आहेत. खरे सांगू का माझ्या मते ते खूप भोळसट आहेत. कारण ते निसर्गात राहणारे, प्रकृती विश्वात रमणारे. त्यांना आपल्यासारख्या शहरातील निसर्गाचा विध्वंस करणाऱ्या व्यक्तींच्या मनो इच्छा ते काय समजणार आणि त्यांनी आपल्यावर विश्वास तरी का ठेवावा?
या जंगलात प्राण्यांची, पक्ष्यांची तसेच मादक द्रव्यांची तस्करी सुद्धा खूप केली जाते. सरकार कितीही जागरूक असले तरी त्यांच्यापर्यंत पोहोचतीलच असे नाही. येथील जमिनी हडपण्यासाठी जाणूनबुजून वणवा पेटवला जातो, वृक्षतोड केली जाते. गोऱ्या लोकांकडे बंदूक असल्यामुळे गोऱ्या पर्यटकांना तर ते आपले शत्रूच समजतात. आदिवासींना त्यांची भीती वाटते असे आदिवासींचे म्हणणे आहे. २८ व्या शतकात काही आदिवासी जमातींचा एका रॉबर्ट इंडस्ट्रीने गुलाम म्हणून उपयोग करून घेतला आणि त्या बिचाऱ्यांचा खूप छळ करण्यात आला. ते पेरूच्या आर्मीला किंवा इतर आर्मीला सुद्धा खूप घाबरतात. त्यांना वाटते की, ते आमची शिकार करतात म्हणून ते बऱ्याच पर्यटकांना शत्रूच समजतात.
येथील सरकारने ज्ञात असणाऱ्या आदिवासींसाठी बऱ्याच योजना केल्या आहेत. ज्यामुळे त्यांना पर्यटनासाठी सुद्धा खूप फायदा होतो. येथील जमिनीचा वापर शेती करण्यासाठी आणि सरकारी योजनांसाठी करण्याचा प्रयत्न ब्राझील सरकारने केला. त्यासाठी त्यांना शेतीसाठी मैदान बनवून देणे, घरे, शाळा बांधून देणे अशा योजना राबविल्या. त्या त्या देशातील सरकार या आदिवासींचा विश्वास संपादन करून त्यांना त्यांच्या जंगलातील रानमेवा आणि इतर व्यवसाय करण्यासाठी शहरात त्यांचं व्यापारीकरणं होण्यासाठी रस्ते तयार करून देण्याचे कार्य करीत आहेत; परंतु ऐतिहासिक घटनांना पाहता यांचे जे शोषण केले गेले होते त्यासाठी सरकारने आता त्यांचे नियम बदलले आणि यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला. अज्ञात आदिवासी जमातींपर्यंत पोहोचूच नये यासाठी नियम काढले. १९६० पासून यांच्या काही जमातींना सरकारने घरे बांधून दिली. या जमातींना बऱ्याचदा पर्यटकांकडून कपडे, खाणे मिळत असते. २१ व्या शतकात यांच्यात खूप मोठी उत्क्रांती झाली. सरकारकडून यांना अनेक सुखसुविधा आणि जनसंपर्क करण्याचे स्त्रोत दिले आहे. कोलंबियातील नुकाक जमातींवर जंगलातील अनेक गोष्टींची तस्करी करणाऱ्या बाहेरच्या देशातील लोकांनी हल्ला करून यांच्या हत्या केल्या. त्यामुळे तेथील सरकारने उरलेल्या जमातीला शहरातील काही भागात स्थलांतरित करून मदत केली. यांच्या समस्या पाहता सरकारने यांच्यासाठी सुद्धा आता नियम बदलून त्यांना संरक्षण दिले आहे. आता बऱ्याचशा आदिवासी जमाती या सुधारित आणि प्रगतिशील आहेत. आधुनिक जगासारखा त्यांच्यातही बदल होत आहे.
आपल्याकडे अनेक दिन साजरे केले जातात. पर्यावरण दिन, हॅपी बर्थडे पण नक्की या पृथ्वीला या भूमातेला काय पाहिजे ते आपण देतो का? जंगल मानवासाठी नाहीच. पण तरी परमेश्वराने या आदिवासींच्या रूपाने खजिनदारांची व्यवस्था या जंगलातील खजाना संरक्षित करण्यासाठी केला आहे. हे आदिवासी नैसर्गिक वातावरणात जगत असल्यामुळे कुठेही पर्यावरण चक्रात किंवा निसर्गचक्रात ढवळाढवळ करीत नाही. खोलवर संशोधन केल्यावर एक गोष्ट लक्षात येते की, यांच्या रूढी-परंपरा यामागे सुद्धा बरीच शास्त्रीय कारणे आहेत जे ते व्यक्त करू शकत नाहीत. जरी काही परंपरा ओंगळ, बेडभ वाटल्या तरी नैसर्गिक जगण्यासाठी त्या आवश्यक अशाच आहेत कारण ते शहरी नाहीत. शहरी बुरखा घालून खोटेपणामध्ये जगणाऱ्या त्या जमाती नाहीत, तर निसर्गात राहून निसर्ग नियमाप्रमाणे जगणाऱ्या त्या जमाती आहेत. किती संकटांचा सामना करावा लागला तरीही त्यांना तिथे त्याच पद्धतीने जगावे लागते. इथे ज्ञात आणि अज्ञात अशी आदिवासी जमात नक्की किती आहे हे आपण सांगूच शकत नाही. नैसर्गिक खतांमध्ये असणारे नैसर्गिक अन्न म्हणजे त्यांच्यासाठी असलेला पौष्टिक आहार म्हणून तेथील आजारांवर सुद्धा ते मात करू शकतात.
परमेश्वरी नैसर्गिक अद्भुत रचना अशी आहे की, ज्या भागात जे आजार तिथेच त्या वनस्पती उगवल्या जातात. जंगलात बारा महिने पाऊस पडत असल्यामुळे दिवसभरातून अनेक वृक्ष कोसळत असतात, त्याच्या जागी नवीन अनेक पालव्या सुद्धा फुटत असतात. एक गोष्ट महत्त्वाची, निसर्ग जेवढं घेतो त्याच्या कित्येक पटीने या भूमातेला देतो. ऑक्सिजन, औषध, खनिजे यांचा मुबलक खजाना या जंगल संपत्तीत आहेच आणि याचा पुरेपूर उपयोग हे आदिवासी आणि इतर जीवसृष्टी करतात. ही लोकं खूप साधी, सरळ, निष्कलंक आणि निर्मळ मनाची, वर्तमानात जगणारी अशीच आहेत. अशा या खजिनदारांचा खजिना आपण नाही संवर्धित करू शकत, तर किमान यांचे संरक्षण तरी नक्कीच करू शकतो.