मायभाषा – डॉ. वीणा सानेकर
आचार्य अत्रे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून अखिल महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. १३ ऑगस्ट रोजी आचार्य अत्रे यांचा जन्मदिवस. अत्रे यांच्या उत्तुंग कार्याचा वेध एका लेखात घेणे अतिशय कठीण आहे. बालशिक्षण हे माझे विशेष आवडीचे क्षेत्र राहिल्याने शिक्षक म्हणून आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व मला खूप महत्त्वाचे वाटते.
पदवीधर झाल्यानंतर अत्रे शिक्षकी पेशाकडे वळले. लंडन येथे शिक्षक होण्यासाठीचा डिप्लोमा पूर्ण करून अत्रे परतले नि शिक्षक म्हणून कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत रुजू झाले. चाकोरीबद्ध शिक्षणात फिरत राहून झापडबंद पद्धतीने शिकणारी पिढी निर्माण होते आहे, हे अत्र्यांना जाणवले. आजच्या शिक्षकांनी अत्रे यांच्या शिक्षक म्हणून जडणघडणीचे अनुभव आवर्जून वाचायला हवेत.
शालेय विद्यार्थ्यांवर उच्च मानवी मूल्यांचे संस्कार होण्याकरिता आपली मराठी काय करू शकते हे अत्रे यांनी प्रयत्नपूर्वक रुजवले. ‘श्यामची आई’ या चित्रपटाची निर्मिती ही त्यांच्या प्रयत्नाचाच भाग होता. १९३०च्या दशकात प्राथमिक शाळेतील मुलांकरिता अत्रे यांनी नवयुग वाचनमाला सुरू केली.
प्रौढ माणसे लिहितात तशी भाषा असेल, तर मुले त्या भाषेचा आनंद घेऊ शकत नाहीत. छापील व बोजड भाषा टाळून घरगुती भाषेचा प्रयोग मुलांकरिता केला गेला पाहिजे, ही दृष्टी मुलांसाठीच्या त्यांच्या लेखनातून स्पष्टपणे दिसते.
फुले आणि मुले हे अत्रे यांच्या पुस्तकाचे उत्तम उदाहरण आहे.
दिनूचे बिल ही अत्रे यांची कथा वाचून सहज डोळे भरून येतात. आईने मुलांसाठी केलेल्या गोष्टींचा हिशोब ठेवता येत नाही, हा संस्कार ज्या पद्धतीने अत्रे यांनी केला, त्याला तोड नाही.
वर्गात नीरस शिकवण्यातून मुलांचा आनंद हिरावला जातो. कोरडेपणाने कविता शिकवणारे शिक्षक कवितेबद्दल नावड निर्माण करतात. निसर्गरंगात निर्माण होऊन चित्र काढणाऱ्या एखाद्या मुलाचे चित्र फाडून त्याला ठोकल्याचे चित्र काढायला लावणारे शिक्षक मुलाच्या मनातील उमलत्या रंगसंवेदना संपवून टाकतात. ‘कुणी बोलायचे नाही अशी ‘चूप बस’ मानसिकता मुलांच्या मनात निर्माण करणारे शिक्षक मुलांमधली जिज्ञासा, उत्सुकता संपवून टाकतात. मुलांना प्रश्न पडणे बंद होतात कारण त्यांना फक्त प्रश्नांची उत्तरे द्यायला लावले जाते. खरे तर गोष्टीतून अध्ययन हा अध्यापनाचा उत्तम मार्ग आहे. प्रत्येक विषयात गोष्ट लपलेली असते. पण ‘गोष्ट सांगा ‘असा हट्ट धरणाऱ्या मुलांना निराश केले जाते.
आचार्य अत्र्यांमध्ये दडलेला शिक्षक अस्सल शिक्षक होता. मुलांना उत्तम मराठी आले पाहिजे, या ध्यासातून अत्रे यांनी मुलांकरिता निर्माण केलेले शब्दविश्व अविस्मरणीय आहे.