मराठी कलाविश्वावर पसरली शोककळा
मुंबई : मराठी चित्रपट असो वा मालिका वा नाटक, प्रत्येक गोष्टीतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) यांचं आज १० ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. विजय हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विजय कदम यांच्या चार केमिओथेरपी व दोन सर्जरी झाल्यानंतर त्यांनी नुकतीच कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली होती. मात्र, आज सकाळी त्यांचं निधन झालं. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी ओशिवरा येथील स्मशानभूमीत दुपारी २ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
विजय दत्ताराम कदम यांनी १९८० च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. लहानपणी ‘राजा भिकारी माझी टोपी चोरली’ या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘रथचक्र’, व ‘टूरटूर’ ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. तर ‘हळद रुसली कुंकू हसलं’ आणि ‘चष्मेबहाद्दूर’ या सिनेमांतील त्यांचं कामही प्रचंड गाजलं.
कसा होता विजय कदम यांचा अभिनयक्षेत्रातील प्रवास?
मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर विजय कदम रंगभूमीचा मार्ग निवडला. विजय कदम हे त्यांच्या विनोदी पात्रांमुळे अधिक लक्षात राहिले. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. ‘टूरटूर’ या नाटकाने त्यांना लोकमान्यता, तर ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाने राजमान्यता मिळवून दिली. या नाटकाचे विजय कदम यांनी १९८६ पासून ७५० हून जास्त प्रयोग केले.
दरम्यान, मराठी चित्रपट क्षेत्रावरही त्यांनी स्वतःची पकड मजबूत ठेवली होती. ‘चष्मेबहाद्दूर’, ‘पोलीसलाईन’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ आणि ‘आम्ही दोघं राजा राणी’ या सारख्या चित्रपटांत त्यांनी अभियनाची छाप उमटवली. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.