राजरंग – राज चिंचणकर
चित्रपट हे माध्यम मनोरंजनासह समाजप्रबोधनाचे व्यासपीठ म्हणूनही ओळखले जाते. जनमानसावर चित्रपटाचा मोठा प्रभाव पडत असतो. साहजिकच, करमणुकीसोबत समाजाला काही संदेश देण्याचे कार्यही मोठ्या पडद्याच्या माध्यमातून अनेकजण करत असतात. ‘लाईफ लाईन’ या मराठी चित्रपटानेही याबाबत दोन पावले पुढे टाकत, महत्त्वाच्या विषयाला हात घातला आहे. ‘ब्रेनडेड’ झालेल्या व्यक्तीच्या शरीरातले काही अवयव, गरजू व्यक्तीच्या शरीरात रोपण केल्यास त्या व्यक्तीला जीवनदान मिळू शकते. पण दुर्दैवाने, याबाबत फारशी जनजागृती होत नाही. किंबहुना, अशा निर्णयासाठी त्या रुग्णाचे आप्त तयारी दर्शवत नाहीत. अगदी याच मुद्यावर ‘लाईफ लाईन’ या चित्रपटाने प्रकाशझोत टाकला आहे.
या ‘लाईफ लाईन’विषयी सांगायचे तर अवयवदानाची महती तो पटवून देतो आणि चित्रपटाचा हा उद्देश स्तुत्य आहे. परंतु तो स्पष्ट करताना रंजकतेची कास अधिक धरल्याने थेट धर्मशास्त्र आणि वैद्यकशास्त्र यांच्यातला संघर्ष हा चित्रपट मांडत जातो. परिणामी, परंपरा आणि विज्ञानाच्या पायावर डॉक्टर व किरवंत या पात्रांमधला वैचारिक सामना पडद्यावर दिसून येतो. अर्थात, एखादा संदेश द्यायचा तर त्याला मनोरंजनाची साथ हवी; या तत्त्वावर हा चित्रपट मार्गक्रमण करत राहिला आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर असे अनुभवी कलावंत यात असल्याने चित्रपटाचे ‘सांगणे’ प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा चित्रपटकर्त्या मंडळींनी धरली असण्याची शक्यता आहे. मात्र हे करताना अतिरंजितपणा थोडा टाळता आला असता, तर चित्रपटाचा मुख्य उद्देश अधिक ठोसपणे पोहोचला असता. असे असले तरी पडद्यावरून वास्तवात येताना मात्र या चित्रपटाच्या मंडळींनी घालून दिलेला पायंडा महत्त्वाचा आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी अवयवदानाचा विषय केवळ चित्रपटातून न मांडता, त्यांनी स्वतःही अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. याच पाऊलवाटेवर चालत या चित्रपटातले ज्येष्ठ कलाकार माधव अभ्यंकर; तसेच चित्रपटाच्या टीममधले काहीजण अवयवदान करण्यास प्रवृत्त झाले आहेत. समाजाला केवळ चित्रपटातून उपदेशाचे धडे न देता, या मंडळींनी घेतलेला निर्णय स्तुत्य म्हणावा लागेल. खोलवर रुजलेली परंपरेची मुळे आणि आधुनिक विचार यांच्यातला संघर्ष, हा या चित्रपटाचा गाभा आहे. आयुष्याचा प्रवास थांबतो म्हणजे तो संपत नाही; तर तिथून एका नवीन आयुष्याच्या प्रवासाला सुरुवात होते, असे या चित्रपटाचे सांगणे आहे. अशोक सराफ व माधव अभ्यंकर यांच्यासह भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, संध्या कुटे आदी कलाकारांनी या ‘लाईफ लाईन’ला संजीवनी दिली आहे. ‘लाईफ लाईन’च्या संदेशाला वास्तवाचे मिळालेले कोंदण, हे या चित्रपटाचे मोठे योगदान म्हणावे लागेल.