उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
मुंबई : मुंबईतील खासगी महाविद्यालयांमध्ये हिजाब, निकाब, बुरखा, टोपी घालण्यावर बंदी (Hijab Ban) घालणाऱ्या परिपत्रकाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कॉलेज प्रशासनाला नोटीस बजावून उत्तरही मागवले आहे. मुंबईच्या एनजी आचार्य आणि डीके मराठे कॉलेजने (NG Acharya & DK Marathe College) हिजाब, निकाब, बुरखा, स्टोल, टोपी घालण्यावर बंदी घातली आहे. याविरोधात नऊ मुलींनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयाने हा अर्ज फेटाळला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कोणी कपाळावर टिळा लावला म्हणून काॅलेजमध्ये प्रवेश नाकारता येतो का? असा सवालही महविद्यालय प्रशासनाला विचारला आहे. विद्यार्थ्यांना हवे ते परिधान करण्याचा पर्याय असणे आवश्यक असल्याचेही म्हटले आहे. १८ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
महाविद्यालयाची सूचना कायम ठेवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुंबईतील काही खासगी महाविद्यालयांनी परिपत्रक जारी करून हिजाब, निकाब, बुरखा, टोपी आणि तत्सम पोशाख परिधान करण्यावर बंदी घातली होती. महाविद्यालय प्रशासनाचा निर्णय धर्माचे पालन करण्याचा मूलभूत अधिकार तसेच गोपनियतेच्या अधिकाराचे उल्लंघन करतो, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने महाविद्यालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले. जर एकसमान गणवेश लागू करण्याचा महाविद्यालयाचा हेतू असेल, तर टिळा आणि टिकली यांसारख्या धार्मिक चिन्हांवर बंदी का घातली नाही? असा सवाल न्यायालयाने केला. महाविद्यालयाची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील माधवी दिवाण यांनी ही खासगी संस्था असल्याचे सांगितल्यावर न्यायमूर्ती कुमार यांनी महाविद्यालय कधीपासून सुरू आहे, अशी विचारणा केली.
नोटीसमध्ये ड्रेस कोडची रूपरेषा
दरम्यान, १ मे रोजी चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन. जी. आचार्य आणि डी. के. मराठे महाविद्यालयाने त्यांच्या अधिकृत व्हॉट्सॲॅप ग्रुपवर एक नोटीस जारी केली होती. नोटीसमध्ये ड्रेस कोडची रूपरेषा देण्यात आली होती. ज्यात हिजाब, निकाब, बुरखा, कॅप, बॅज आणि कॉलेजच्या परिसरात चोरी करण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हा वाद सुरू झाला होता.