Wednesday, March 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRaj Thackeray : माझी गाडी रोखणारी माणसं जरांगेंची नाही, तर ठाकरे आणि...

Raj Thackeray : माझी गाडी रोखणारी माणसं जरांगेंची नाही, तर ठाकरे आणि पवारांची!

जातीमध्ये द्वेष पसरवणे हे शरद पवारांचे राजकारण; राज ठाकरे यांनी केला आरोप

छत्रपती संभाजीनगर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) काल बीड दौऱ्यावर असताना त्यांच्या ताफ्यावर ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्याची घटना घडली होती. या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ‘एक मराठा, लाख मराठा’, अशा घोषणा देत राज ठाकरेंचा ताफा अडवला. या घटनेमुळे ठाकरे विरुद्ध ठाकरे वाद पुन्हा एकदा पेटला आहे. यावरुन आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर जोरदार टीका केली. ‘माझी गाडी रोखणारी माणसं जरांगेंची नव्हती, तर ठाकरे आणि पवारांची होती’, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.

ताफ्यावर सुपाऱ्या फेकल्यावरून राज ठाकरे म्हणाले की, माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीच संबंध नव्हता. त्यांचा विषय देखील नाही. त्यांच्या आंदोलनामागून शरद पवार आणि उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. यातील दुर्देवी बाब म्हणजे काही पत्रकार या गोष्टीत सहभागी झाले आहेत. मला त्यांची नावे देखील माहीत आहेत. योग्य वेळी चौकशी होईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शरद पवारांवर आरोप केला आहे. दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उदयानंतर आले आहे. आज माझ्या दौऱ्यात त्यांनी व्यत्यय आणला. उद्या माझे मोहळ उठले तर एकही सभा घेता येणार नाही. माझ्या वाट्याला जाऊ नका. तुमच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत, समाजात तेढ निर्माण करुन राजकारण यांना करायचे आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले.

जातीमध्ये द्वेष पसरवणे हे शरद पवारांचे राजकारण

मनोज जरांगे पाटलांच्या अडून विधानसभेचे राजकारण सुरू आहे. शरद पवारांसारखा व्यक्ती मणीपूर होईल, असे वक्तव्य करत आहे. शरद पवारांसारखा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती आहे. त्यांनी पुढे येऊन हे सगळे थांबवले पाहिजे तर तेच म्हणतात, महाराष्ट्राचा मणिपूर होईल. शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे तर तेच हातभार लावत आहेत. शरद पवारांचे राजकारण हे जातीमध्ये द्वेष पसरवणे हेच आहे. निवडणुका येतील जातील यांच्या नादी लागू नका, असं राज ठाकरे म्हणाले.

पहिल्यापासून मनसेची भूमिका एकच

राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटले की, २००६ साली मी माझ्या पक्षाची स्थापना केली आहे. तेव्हापासून आजपर्यंत आमची एकच भूमिका आहे. आरक्षण द्यायचे असेल तर आर्थिक निकषांवर द्यावे. त्यावर माझे म्हणणे आहे की, महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच नाही. देशात महाराष्ट्रासारखे दुसरे राज्य नाही. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे आहेत. अनेक नोकऱ्या आहेत, पुरून उरेल एवढ्या नोकऱ्या आहेत. त्या बाहेरील लोकांना देण्यापेक्षा मराठी मुलांना द्यावात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे फक्त जातींचे राजकारण केले जात आहे आणि माथी भडकवली जात आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -