समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे काम प्रगतिपथावर
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे (Samruddhi Mahamarg) पाहिले जाते. हा मार्ग ७०१ किलोमीटर लांबीचा असून सध्या या महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आतापर्यंत या महामार्गाचे ६२५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून त्यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. विशेष म्हणजे बाकी राहिलेले ७६ किलोमीटरचे काम देखील जलद गतीने सुरू असून येत्या काही दिवसांनी हा संपूर्ण महामार्ग सर्वसामान्यांसाठी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता नागरिकांचा अतिवेगाने प्रवास होणार असून वाहन इंधनाची देखील बचत होणार आहे.
समृद्धी महामार्गावरील नागपूर ते मुंबई या अंतिम टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. या टप्प्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून येत्या सप्टेंबर अखेपर्यंत हा टप्पा संपूर्णरित्या पूर्ण करुन हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर नागपूर ते भिवंडी अंतर केवळ आठ तासांत पूर्ण होणार आहे. तर, इगतपूरी ते अमणे हे अंतर सव्वा तासांत पूर्ण करता येणार आहे. त्याचबरोबर, ठाणे ते नाशिकसाठी केवळ अडीच तास लागणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या या टप्प्यामुळं प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे इंधनाची बचतदेखील होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.
इगतपुरी ते कसारा ८ मिनिटांचा प्रवास
दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्यात एकूण ५ बोगदे आहेत. त्यातील इगतपुरी येथील आठ किमीचा बोगदा महाराष्ट्रातील मोठ्या लांबीचा बोगदा आहे. या बोगद्यामुळे प्रवाशांना अवघ्या आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर गाठता येणार आहे.