पोस्टर्समध्ये उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन करण्यात आली टीका
ठाणे : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील आज याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मेळावा आयोजित केला आहे. मात्र, या मेळाव्यापूर्वीच ठाण्यामध्ये ठाकरेंच्या विरोधकांकडून त्यांना डिवचणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन या बॅनर्समधून टीका करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींसमोर लोटांगण घालताना दिसत आहेत. सोबतच या पोस्टर्सवर ‘घालीन लोटांगण, वंदिन चरण’ असं लिहिण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे हे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गडकरी रंगायतन येथे त्यांची सभा होणार आहे. या सभेआधी उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे मोठे होर्डिंग अनेक ठिकाणी लागले आहेत. ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, हे बॅनर्स कोणी लावले हे समोर आले नसले तरी या बॅनर्समुळे ठाण्यामध्ये राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून हे बॅनर्स हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आजच्या ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.