Thursday, July 3, 2025

Metro railway project : दहिसर ते भाईंदर मेट्रो रेल्वे प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत होणार पूर्ण!

Metro railway project : दहिसर ते भाईंदर मेट्रो रेल्वे प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत होणार पूर्ण!

भाईंदर : मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा क्रमांक ९ दहिसर ते भाईंदर या कामाला ९ सप्टेंबर २०१९ रोजी सुरवात झाली होती. त्या दिवसापासून मीरा भाईंदर शहरातील नागरिक आतुरतेने वाट पाहत असलेल्या मेट्रो रेल्वेची सेवा त्यांना डिसेंबर २०२५ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे तर काशी गावा पर्यंतचा पहिला टप्पा या वर्ष अखेर पर्यंत सुरू होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.


मीरा भाईंदर मुंबई शहराला जोडण्यासाठी दहिसर ते भाईंदर मेट्रो मार्ग क्र.९ ला शासनाने मंजुरी दिल्यावर ९ सप्टेंबर २०१९ ला मेट्रोचे काम सुरू झाले होते. ते काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. आता या कामाला दोन वर्षे उशीर झाला आहे. मीरा भाईंदर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर मुंबईत प्रवास करत असतात. मेट्रो रेल्वे सेवा लवकर सुरू होण्यासाठी माजी नगरसेवक अजित पाटील यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.


त्यांना पाठविलेल्या उत्तरात एमएमआरडीएने नमूद केले आहे की, दहिसर-भाईंदर मेट्रो मार्ग दोन टप्प्यात सुरू करण्याची योजना असून पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगाव स्थानक डिसेंबर २०२४ पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान स्थानकापर्यंत डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. स्थानकांचे आतील व रुळ टाकण्याचे काम वेगाने सुरू असून मेट्रोचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. दहिसर ते भाईंदर दरम्यान आठ मुख्य स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव आणि काशीगाव या चार स्थानकांपर्यंत मेट्रो सुरू करण्याची तयारी आहे, तर उर्वरित चार स्थानकांपर्यंत वर्षभरानंतर म्हणजे डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू होईल.


नागपूरच्या धर्तीवर दहिसर-भाईंदर मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. मेट्रो रेल्वे खाली तीन उड्डाण पूल बांधले जात असून, त्यापैकी प्लेझेंट पार्क ते साईबाबा नगर हा उड्डाण पूल तयार झाला आहे. लवकरच हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.



मेट्रो मार्ग ९ प्रकल्पाचे स्थापत्य काम ८७% पूर्ण झाले आहे व स्थानकांची अंतर्गत कामे व मेट्रो ट्रॅकची कामे प्रगतीपथावर आहे. मेट्रो मार्ग ९ प्रकल्प २ टप्यात सुरु करण्यात येणार असून दहिसर ते काशीगाव (टप्पा १) हा डिसेंबर, २०२४ व काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम स्थानक (टप्पा २) हा डिसेंबर, २०२५ पर्यंत सुरु करण्यास प्रयत्नशील आहे.



Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >