टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
समाजातील वास्तव दर्शन चित्रपटात दाखविण्याचे स्वप्न अनेकांच्या मनात असते, परंतु साऱ्यांनाच ते शक्य होत नाही. काहींचे ते स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी काही वेळ जातो, त्या कालावधीत ते नाउमेद न होता त्यासाठी सतत प्रयत्नांची पराकाष्ठा करीत राहतात. स्वप्न सत्यात उतरल्यानंतर मात्र त्यांच्या आनंदाला उधाण येते.असाच एक लेखक व अभिनेता ज्याचे नाव आहे अंकुर क्षीरसागर. त्याचा ‘युवा नेता’ हा मराठी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाची कथा त्याने लिहिली आहे व यामध्ये त्याने मुख्य भूमिका देखील साकारलेली आहे.पुणे व नाशिक येथून त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. बालपणापासून त्याला लिखाणाची आवड होती, छंद होता. शाळेत असताना त्याने काही एकांकिका लिहिल्या होत्या. शालेय शिक्षण संपल्यानंतर सर्वप्रथम त्याने ‘खांद्यावरचे आभाळ’ या नाटकात भूमिका केली. नंतर ‘लफडेबाज’ या नाटकाचे लेखन केले. त्यात भूमिका देखील केली. अशोक सम्राटचा मुलगा मिलिंद यावर ‘मिलिंद पन्हा’ हे नाटक केले. ‘कौन बनेगा स्वर्गपती’ हे नाटक केले.त्यानंतर त्याच्या जीवनात टर्निंग पॉइंट आला, त्याने एक कथा लिहिली. त्यावर आता ‘युवा नेता’ हा मराठी चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. एका सामान्य माणसाची राजकारणात होणारी अवहेलना या चित्रपटामध्ये पहायला मिळणार आहे. त्या माणसाला जगू दिले जात नाही. राजकारण म्हणजे समाजकारण, परंतु आजकाल राजकारण म्हणजे सत्ता, सत्तेसाठी काहीही असे मत अंकुर क्षीरसागर यांनी मांडले.
युवा पिढीने जागरूक असले पाहिजे. आपले चांगले कशात आहे याची जाणीव त्याला असावी. उगाचच राजकारणात स्वतःच्या फायद्यासाठी जाऊ नये. राजकारण कमी व समाजकारण जास्त करावे. राजकीय नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा स्वतःच्या घरातील व्यक्तींचे वाढदिवस साजरे करावे. दंगली, आंदोलनामध्ये कार्यकर्ते भरडले जातात. याचा युवा पिढीने कुठेतरी विचार करणे आवश्यक असल्याचे मत त्याने व्यक्त केले. केवळ लोकांना दाखवायला समाजकारण करू नये. एखाद्याची मदत करावी, परंतु त्याचा गाजावाजा करू नये असा या चित्रपटातून संदेश देण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये तीन गाणी आहेत.
प्रेमाचा त्रिकोण आहे. अंकुशला समाजात घडणाऱ्या सत्य घटनेवर लिहायला आवडते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची जाणीव प्रेक्षकांना चित्रपटातून करून देण्यासाठी त्याचे लिखाण असते. युवा नेत्याने राजकारण कमी समाजकार्य जास्त करावे. अंकुश क्षीरसागरला त्याच्या आगामी ‘युवा नेता’ चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा !