भालचंद्र कुबल – पाचवा वेद
धनपतराय श्रीवास्तव कोण होते? हे मराठी नाट्यकर्मीना विचारले तर उत्तर मिळेलच याची शाश्वती नाही, मात्र मुन्शी प्रेमचंदांबाबत विचारा, हिंदी साहित्यकार म्हणून त्यांचा परिचय आपल्याला शालेय जीवनापासून आहे. ३१ जुलै ही मुन्शीजींची जयंती. आदर्शोन्मुख यतार्थवादी लेखक, पत्रकार, अध्यापक, आदी क्षेत्रात चौफेर लेखन करणारा साहित्यकार ही त्यांची खरी ओळख. उर्दू भाषेतून लिखाणास सुरुवात करणाऱ्या कादंरीकाराने, त्याच भाषेच्या प्रभावाखाली पुढले लेखन हिंदीत केले आणि ते अत्यंत लोकप्रिय ठरले. हंस, माधुरी, मर्यादा पत्रिका या मासिकांचे त्यांनी संपादनही केले. विशेष म्हणजे अजंठा सिनेटोन या सिनेमा कंपनीत चित्रपट लेखक म्हणूनही काम केले, परंतु हे क्षेत्र न आवडल्याने त्यांनी जागरण नावाचे स्वतःचे साप्ताहिक सुरु केले. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या सोजेवतन (मराठीत “राष्ट्रविलाप”) या त्यांच्या पहिल्या वहिल्या कथासंग्रहावर ब्रिटिश सरकारने राष्ट्रद्रोहाचा ठपका ठेऊन सर्व छापील प्रती जाळून टाकण्यात आल्या होत्या. पुढे तर त्यांच्या लेखनावरच बंदी घालण्यात आली पण ‘जमाना’ या मासिकाचे संपादक मुन्शी दयानारायण निगम यांच्या सल्ल्यानुसार धनपतराय श्रीवास्तव “मुन्शी प्रेमचंद” झाले. हा इतिहास कदाचित आताच्या पिढीतील मराठी नाट्यकर्मींना माहित असेल नसेल याबाबत माझ्या मनात शंका असल्याने या प्रस्तावनेचा खटाटोप.
मराठी हौशी रंगभूमीवर मुन्शीजींच्या अनेक कथांचे सादरीकरण व रूपांतरण पारितोषिके मिळवून गेले आहे, परंतु असे किती मराठी रंगकर्मी आहेत, ज्यांना यावर्षी मुन्शी प्रेमचंदाची आठवण झाली? मराठीत बहुधा विरळच परंतु हिंदी नाट्यसृष्टीत मात्र त्यांची जयंती मुजीब खान यांनी अनोख्या पद्धतीने साजरी केली. त्याचा वृत्तांत किंबहुना आढावा घेणे अत्यंत जरुरी आहे. शासनमान्य असलेल्या २२ भाषांमधून प्रेमचंदांच्या २२ कथांचा महोत्सव “प्रेमउत्सव” नावे मैसुर असोसिएशन, माटुंगा, मुंबई येथे पार पडला. भारतातल्या बावीसही भाषांचे ज्ञान कुठल्याही मुंबईकराला असणे दुरापास्तच होते, परंतु त्यावरही तोडगा म्हणून प्रत्येक नाट्यसादरीकरणा अगोदर त्या कथेबाबतचे सिनाॅप्सिस हिंदी तथा इंग्रजी भाषेतून निवेदनातून सांगण्यात येई व नंतर नाटक सुरु होई. मणिपुरची बोडो भाषा अवगत असणारा एकही प्रेक्षक या कार्यक्रमास नव्हता मात्र सुरुवातीच्या निवेदनाने ती भाषा, ती कथा कळायला सोपे गेले. ही संकल्पना राबवणारे मुजीब खान हे राष्ट्रप्रेमाने प्रेरीत होऊन हा उपक्रम गेली सात वर्षे राबवताहेत म्हटल्यावर कुठल्याही रंगकर्मीला अभिमान वाटावा अशीच ही गोष्ट आहे. कल्पना करा की प्रेमचंदांच्या एवढ्या विपुल हिंदी साहित्यातून बावीस कथांमधून बावीस भाषासाठी संहिता निवडून त्या रुपांतरीत वा भाषांतरीत करणे, केवढे जिकिरीचे काम आहे. त्यानंतर त्यांचे प्रयोग सादर करणे…!
एखादा जिद्दी रंगकर्मीच हे करु शकतो. मुजीब खान यांनी भारतीय साहित्यातील अनेक लेखकांबाबत असे विविध उपक्रम राबवले आहेत. निवडक पु. ल. देशपांडे त्यांनी हिंदीत सादर केले आहेत. या प्रेमउत्सवात मराठीत कुठली कथा सादर होणार यावर अर्थातच माझे लक्ष होते. सादर झालेली कथा “सद्गती” या अगोदर मराठी एकांकिकेतून “मैत” आणि हिंदीतून “मय्यत” नावाने गाजलेली होती. ८० च्या दशकात हरीष तुळसुलकरने “मैत” किर्ती महाविद्यालयाकडून आय. एन. टी. उन्मेष सारख्या नामांकित स्पर्धांमधून गाजवली होती. ती पुन्हा बघताना जुन्या आठवणी ताज्या झाल्या. याच कथेवर १९८१ मध्ये सत्यजित रे यांनी बनवलेली “सदगती” देखील प्रचंड गाजली. अशा मुन्शीजींच्या गाजलेल्या २२ कथांचे सादरीकरण म्हणजे पर्वणीच होती. मुलतः लेखकाची कथा नाटक या माध्यमातून व्यक्त होणे म्हणजे ती व्हिज्युअली स्ट्राॅंग (दृक सामर्थ्य) असणे गरजेचे असते. मुन्शी प्रेमचंदाच्या नव्वद टक्के कथा दृक सामर्थ्याने भरलेल्या आहेत. कथा वाचतानाच सामान्यातला सामान्य वाचकवर्ग व्हिज्युअलाईज करु शकतो. लेखन सामर्थ्य म्हणतात ते हेच असते. मराठी व्यतिरिक्त पंजाबीमधून “गृहनिती”, उडीया भाषेतील “अभागन”, आसामीतील “नादान दोस्त” आणि हिंदीमधील “बडे घर कि बेटी” या कथांनी पहिला दिवस बांधून ठेवला. राहून राहून एक थक्क करणारी गोष्ट सातत्याने जाणवत होती की एवढा मोठा नटसंच मुजीब खान यांनी आणला कुठून? तर त्याचे उत्तर म्हणजे गेली चाळीसहून अधिक वर्षे रंगभूमीसाठी दिलेले अथक योगदान.
आयडीया ही त्यांची संस्था हिंदी, उर्दू तथा इंग्रजी भाषेतून नवनवीन नाटके, नाट्यप्रशिक्षण, सामाजिक आशयांवरील पथनाट्ये व विविध भाषांतील लेखकांना भारतीय कॅनव्हासवर सादर करण्याचे सातत्य, त्यांना सृजनतेच्या वेगळ्याच प्रतलावर नेऊन ठेवते. त्यांच्याकडून प्रशिक्षित झालेल्या आणि या उत्सवात सहभागी झालेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी हा उत्सव यशोमार्गावर नेऊन ठेवला. २२ भाषांतून सादर झालेले “प्रेमउत्सव” हे दिव्यनाट्य लवकरच मुजीब खान यांना गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये घेऊन जाईल. मराठी माध्यमांनी मात्र या उपक्रमाची जराही दखल घेतलेली नाही. नाटकांसाठी समीक्षा करणारे पीआरओ सद्या मराठीत होणाऱ्या (अथवा न होऊ घातलेल्या) जागतिक विक्रमांच्या बातम्या देण्यात दंग आहेत. अन्य भाषिक मराठीसाठी काय करतात, यांच्याशी मराठीतील प्रसार माध्यमांसाठी कंटेंटचा रतीब घालणाऱ्या लेखकांना याची पुसटशी कल्पना देखील नाही. असो, एकमात्र खरे आहे की मुजीब खान यांच्यासारखे नाटकासाठी आयुष्य झोकून दिलेले सृजनशील नाट्यकर्मी वयाच्या पासष्टीतही असे उपक्रम घडवतच राहतील.