आम्ही ठाकरं ठाकरं, या रानाची पाखरं
या जांभळ्या गर्दीत मांडून इवले घर
या पिकल्या शेतावर तुझ्या आभाळाचा थर,
या डोंगरवस्तीवर भोळ्या शंभूची पाखरं,
त्यांच्या पंखात पंखात नांदतोया संसार…
असा हा डोंगर-दऱ्यातून खुशाल हिंडणारा आणि मुक्त फिरणारा आदिवासी राजा. या आदिवासी नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर डोंगर-दऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जीवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. ९ ऑगस्ट या दिवशी आदिवासी समजाच्या समृद्ध संस्कृतीला मान देणे आणि त्यांच्या योगदानाची कदर करणे हा उद्देश आहे. त्यानिमित्ताने…
जागतिक आदिवासी दिन – वर्षा हांडे-यादव
जंगलाचा मी राहिवासी
नातं माझं निसर्गाशी.
झाडे, वेली पशु-पक्षी सारे
आहेत माझे मित्र. खरे
मंजुळ पावरी वाजे
आम्ही आहोत जंगलाचे राजे.
आदिवासी लोकांच्या जीवनात शाश्वता व नैतिकता यांचे अनमोल गुण आहेत. त्यांनी आपल्या भूमीशी व निसर्गाशी घडवलेले नाते आपल्या पर्यावरणासाठी महत्त्वाचे आहे. त्यांची पांरपरिक ज्ञानाची पद्धत आणि जीवनशैली पर्यावरणाच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावते. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले की, २१व्या शतकात म्हणजे तंत्रज्ञानाच्या संगणकाच्या युगात सुद्धा जगातील वेगवेगळ्या देशामधील आदिवासी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे. गरिबी, ज्ञान, आरोग्य सुविधांचा अभाव, बेरोजगारी, मजुरी अशा अनेक समस्यांनी हा समाज ग्रासलेला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाने आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली, तेव्हापासून संपूर्ण जगभरात हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आदिवासी समाजाची विविधता व त्यांची संस्कृतिक परंपरा आपल्याला समृद्ध करते. त्यांची परंपरा आणि कला आपल्याला नवीन दृष्टिकोन देते आणि समजाची विविधता अधिक समृद्ध बनवते. आदिवासींना निसर्गाविषयी खूप आवड असते. निसर्गाची ते पूजा करतात. निसर्गावर त्यांची निसीम श्रद्धा असते. आदिवासी या शब्दामधील आदि म्हणजे खूप आधीपासून आणि वासी म्हणजे वास्तव्य करणारे लोक. म्हणजे आदिवासी. जंगलामधून कंदमुळे, फळे, तंतू, मध, ओेषधी वनस्पती गोळा करणे हे आदिवासी लोकांचे मुख्य व्यवसाय आहेत.
आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. संयुक्त राष्ट्र संघटना आणि तिची सलग्न संस्था, आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेत आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात मूळ निवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आज आपण आदिवासी समाजाच्या योगदानाची प्रशंसा करूया. त्यांच्या अधिकाराची रक्षा करण्यासाठी सजग राहुया.
अहो देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे
घेणाऱ्याने घेता घेता
देणाऱ्याचे हात घ्यावे…
या उक्तीप्रमाणे आदिवासी समाजाने देशासाठी खूप काही केले, दिले आहे आणि आजही ते देत आहेत. आज या आदिवासी लोकांमुळे जंगले सुरक्षित आहेत. पण स्वतः आदिवासी मात्र आजही ते उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. गरिबी, अज्ञान अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपल्या देशात पैसा कायद्यान्वये आदिवासी समाज बांधवांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आदिवासी समाजाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. आदिवासी लोकांच्या बोलीभाषा देखील विविध प्रकारच्या असतात. कोरकू, कोलामी, गोंडी, गोरमाटी, वाघरी, सावरा, पावरी अशा अनेक बोलीभाषा आदिवासी लोक बोलतात. यातील बहुतेक भाषांना लिपी नाहीत. त्यामुळे या भाषा जपल्या गेल्या पाहिजेत.
प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतंत्र अशी पंचायत असते. आदिवासी समाजामध्ये परंपरेला खूप महत्त्व आहे. आपल्या परंपरेचा ठेवा एक पिढी दुसऱ्या पिढीला गाणी, नृत्य, कथा इत्यादी माध्यमातून देते. आदिवासी लोकांची लोककला, चित्रकला, गायन-वादन, नृत्यकला, शिल्पकला अतुलनीय असतात. कोकणातील वारली जमातीची वारली चित्रकला किती अप्रतिम आहे. महाराष्ट्रामध्ये मल्हार कोळी, महादेव कोळी, वारली, कोकणा, कातकरी, ठाकर, पावरा, गावित, भिल्ल, कोरकू अशा अनेक आदिवासी जमाती आढळतात. या जमाती ठाणे, पालघर, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये वास्तव्यास पाहावयास मिळतात. आज काही ठिकाणी आदिवासी समाज खूप प्रगती करत आहेत. सर्व भारतीयांनी विकासाच्या प्रवाहापासून दूर असणाऱ्या आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले आदिवासी बांधवांचे योगदान मोलाचे आहे. सह्याद्रीचा ढाण्या वाघ आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे काळ कुणासाठी थांबत नाही; परंतु त्याच काळाच्या छाताडावर पाय ठेवून स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या मनामनात पेटविणारे, जल, जंगल, जमीन यासाठी पहिला उठाव करणारे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा, कडकडाडे बिजली अशी शत्रूची लष्करे झिजली, इंग्रजाना सळो की पळो करून सोडणाऱ्या राणी, झनकारी अशा अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी इंग्रजाविरुद्ध लढताना आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या पराक्रमाने आदिवासी समाजाची मान उंचावली आहे. आज आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या एक आदिवासी महिलाच आहेत. ही आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची, गौरवांची गोष्ट आहे. तसेच सर्वांचे लाडके, आदरणीय नरहरी झिरवाळ हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. हे सुद्धा आदिवासी समाजातीलच आहेत. शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते.
“जंगल राखले तुम्ही
निसर्ग देवतेचं देवपण
श्रद्धेने जपलं तुम्ही
म्हणून सर्व
आदिवासींचा सन्मान करतो आम्ही. “
जय आदिवासी ||