Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजकाँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंच्या हाती कोरडे चिपाड!

काँग्रेसची हुजरेगिरी करूनही उद्धव ठाकरेंच्या हाती कोरडे चिपाड!

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा घणाघात

मुंबई : मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी तीन दिवस दिल्लीत मुक्काम करणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना काँग्रेसची (Congress) हुजरेगिरी करूनही हाती कोरडे चिपाडच लागले. तीन दिवस बैठका, भेटी घेऊनही रिकामे हात हलवत परत यावे लागले आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते. उबाठाच्या दिल्ली वारीतून महाराष्ट्राच्या वाट्याला तर सोडाच पण उबाठाच्या हातीही धुपाटणेच आले, अशीही कोपरखळी उपाध्ये यांनी मारली.

उपाध्ये म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठका म्हणजे निव्वळ कोरडे चिपाड आहेत, ना चव..ना रस… ना गोडवा आहे. मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेपायी उद्धव ठाकरेंनी दिल्लीचे उंबरे झिजवले. पण काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा निवडणुकीनंतर होणार असून ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे सांगून ठाकरे यांची निराशा केली. जागावाटपातही काँग्रेस मोठा भाऊ असणार असा स्पष्ट संदेश दिल्लीवारीतून उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने दिल्याने उबाठा सेनेने स्वाभिमान गमावला आहे.

विधानसभेसाठी जास्ती जागा लढविता याव्यात यासाठी उबाठांनी दिल्लीवारी केली. मात्र त्याही बाबतीत निराशाच पदरी पडणार आहे. ज्या अमित शहांची तुलना ठाकरे यांनी अब्दालीशी केली, तेच अमित शहा भाजपाचे अध्यक्ष असतानाही मातोश्रीवर चर्चेसाठी आले होते. २०१९ मध्ये भाजपाने तुमचा सन्मान राखत तुम्हाला १२५ जागा दिल्या होत्या. आता तुम्हाला १०० जागा मिळवण्यासाठी काँग्रेसच्या दिल्ली तख्तापुढे झुकावे लागते आहे. जागावाटपात १०० जागाही तुम्हाला मिळणार नाहीत मग तुमच्या दिल्ली दौ-यातून नेमके पदरी तरी काय पडले, असा खोचक सवाल उपाध्ये यांनी केला.

महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुती सरकार प्रामाणिक प्रयत्न करत असताना उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन मविआच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून आरक्षणाबाबत काही ठोस भूमिका घेतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती ती देखील धुळीस मिळाली. ठाकरे हे केवळ स्वत:च्या राजकीय हव्यासापोटी दिल्लीला गेले होते. त्यांना महाराष्ट्राच्या आणि जनतेच्या हिताशी काहीही देणेघेणे नाही, अशी टीका उपाध्ये यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -