मुंबईत लोकलमध्ये लोकांना जनावरांप्रमाणे प्रवास करताना पाहून लाज वाटते, ‘अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी अलीकडेच केली. गर्दी असलेल्या गाड्यांमधून पडून किंवा रुळावरील इतर अपघातांमुळे होणारे मृत्यू संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर जून महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान मांडलेले मत असले तरी, लोकल प्रवास ही अत्यंत गंभीर समस्या आहे, याकडे खंडपीठाने लक्ष वेधले आहे. गेल्या आठ दिवसांत मध्य रेल्वेच्या मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे प्रवाशांचा झालेला खोळंबा पाहिला. त्यात गेले अनेक दिवस रेल्वे गाड्या लेट धावत आहेत, त्याची नक्की कारणे काय आहेत, याचा प्रवाशांना थांगपत्ता लागलेला नाही.
रोज लेटमार्क लागू नये म्हणून ट्रेन आल्यानंतर जीव मुठीत धरून, या गर्दीतून वाट काढत लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. गर्दी असल्याने त्यासाठी पाठीवरची बॅग पुढे अडकविण्याशिवाय पर्याय नसतो. मोबाइल चोरीला जाऊ नये म्हणून तो बॅगेत ठेवला जातो; परंतु रिंग वाजली तरीही तो गर्दीत उचलणे हे अशक्य होते, हा झाला सर्वसामान्य मुंबईकरांच्या प्रवाशांचा एक भाग. त्यात, ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, मेगा ब्लॉकमुळे अप आणि डाऊन मार्गावर प्रवाशांचे अतोनात हाल, या बातम्यांचे मथळे आता वर्तमानपत्रांसाठी रोजचा भाग बनले आहेत. उपनगरी रेल्वे प्रवाशांना त्याची सवय झाली आहे.
मुंबई उपनगरी रेल्वे ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे या दोन क्षेत्रीय विभागामार्फत ती चालवली जाते. उपनगरी रेल्वेने मुंबईत सुमारे ७५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. ही संख्या संपूर्ण भारतीय रेल्वेच्या एकूण प्रवासीसंख्येच्या अर्ध्याहून जास्त आहे. जगातल्या सर्वात अधिक प्रवासी घनता असणाऱ्या शहरी रेल्वे प्रणालींपैकी ही एक आहे. सर्वसामान्य लोक या मार्गांवर चालणाऱ्या गाड्यांना लोकल ट्रेन असे संबोधतात. रेल्वे ही सामान्य जनतेची संपत्ती असून जनतेसाठी सेवा देणारी यंत्रणा आहे; परंतु या यंत्रणेवर प्रवाशांचा वाढलेला ताण कमी करण्यासाठी प्रशासन कुठे कमी पडत आहे का, याचा विचार करण्याची गरज आहे.
२०१७ साली पहिल्यांदा पश्चिम उपनगरीय रेल्वेमार्गावर एसी लोकल चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रवाशांना नावीन्याचे आकर्षण होते. या एसी लोकलमुळे मुंबईतील हायवे, रस्त्यांवरील वाहतुकींची कोंडी कमी होईल अशी अपेक्षा केली होती; परंतु कालांतराने ‘घी देखा लेकिन बडगा नही देखा’ याप्रमाणे सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करून एसी लोकलच्या फेऱ्या होऊ लागल्या. मात्र दररोज प्रवास करणाऱ्यांना महागडे भाडे परवडणारे नव्हते. त्यामुळे उलटा परिणाम होऊन सामान्य लोकलची गर्दी वाढली आणि एसी लोकल हा पांढरा हत्ती ठरू लागला, असे वाटू लागले आहे. तरीदेखील मध्य रेल्वेवर एसी लोकल धावू लागल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली. याबाबत अनेकदा प्रवाशांनी आंदोलने केली असली तरी, त्याचा प्रशासनावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. वास्तविक सर्व लोकल पंधरा डब्यांच्या करण्याचे दहा-पंधरा वर्षांपूर्वी हाती घेतले होते. त्यामुळे निश्चितच दिलासा मिळाला असता. मात्र फारच कमी प्रमाणात पंधरा डब्यांच्या लोकल धावत आहेत. थेट आसनगाव, कसारा, कर्जत, डहाणू, पालघर या दूरवरून लाखो प्रवासी प्रवास करीत आहेत. आता तर पनवेल, उरणपर्यंत लोकल धावत आहेत. मात्र लोकलची संख्या वाढत नाही. कल्याणपुढील आसनगाव, कसारा या भागातील प्रवाशांबाबत रेल्वे नेहमीच उदासीनता दाखवत आहे, असे चित्र आहे. त्यात, विशेषत: कुर्ला, सायन, घाटकोपर, दादरसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रवासी अक्षरश: ताटकळत उभे असल्याचे चित्र नेहमीच पाहायला मिळते. त्यात गेल्या दोन-तीन महिन्यांत मध्य रेल्वेचे वेळापत्रक पाहिले तर गाड्या विलंबाने धावताना दिसतात. रेल्वे फलाटावर इंडिकेटरवर दर्शवलेली लोकल ही त्याच वेळेवर येईल याचा भरवसा ठेवायला आता मुंबईकर तयार नाहीत. अनेक रेल्वे स्थानकावर वेळेवर उद्घोषणा होत नसल्याने कोणती लोकल ट्रेन ही कोणत्या रेल्वे फलाटावर येणार आहे याची कल्पना येत नसल्याने, प्रवाशांचे हाल होताना दिसतात. त्यातच लोकल विलंबाने आणि खच्चून भरलेल्या असल्याने प्रवाशांच्या त्रासात भर ही नित्याची बाब बनली आहे. त्यात बरचसे मुंबईकर कुटुंबासमवेत बाहेर पडल्याने सोबत असलेल्या चिमुकल्यांसह महिलांना ब्लॉकचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
लोकलच्या क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने प्रवाशांना प्रवास करावा लागतो, ही समस्या आजची नाही, कित्येक वर्षे लोकल प्रवाशांच्या नशिबी जीवघेणा प्रवास येत आहे. रेल्वेला मुंबईतून सर्वाधिक महसूल मिळतो. मात्र रेल्वे प्रवाशांची खरी गरज लक्षात न घेता, प्राथमिकतेचा विचार न करता नको त्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते आणि त्याची किंमत प्रवाशांना मोजावी लागते. ‘दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही’ या ओळीप्रमाणे मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरू आहे; परंतु घरातून नोकरी-धंद्यांच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दुसरा सोपा प्रवाशांचा पर्याय काय हा प्रश्न आता लाखो मुंबईकरांना सतावतोय. त्यावरील उत्तर अद्याप अनुत्तरीत आहे.