Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडी'घरोघरी तिरंगा अभियाना'चे रूपांतर आता लोकचळवळीत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘घरोघरी तिरंगा अभियाना’चे रूपांतर आता लोकचळवळीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ऑगस्ट क्रांती मैदान येथून ‘घरोघरी तिरंगा अभियाना’चा राज्यस्तरीय शुभारंभ

मुंबई : लाखो स्‍वातंत्र्यसैनिकांच्‍या त्‍याग, बलिदानातून देशाला स्‍वातंत्र्य मिळाले. त्यांच्या त्याग आणि बलिदानाची जाणीव विद्यार्थी, तरूणाई आणि भावी पिढीला व्‍हावी, त्‍यांच्‍यात राष्‍ट्रीयत्‍वाची भावना रूजावी, यासाठी ‘घरोघरी तिरंगा अभियान’ (Har ghar Tiranga) प्रेरणादायी ठरेल. त्‍यांना राष्ट्रप्रेमाची नवी उभारी देईल. घरोघरी तिरंगा अभियान आता लोकचळवळ बनली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिका आणि राज्‍य शासनाच्‍या सांस्‍कृतिक कार्य विभागाच्‍या वतीने ऑगस्ट क्रांती मैदान येथे घरोघरी तिरंगा (हर घर तिरंगा – Har ghar Tiranga) अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते आज, दिनांक ९ ऑगस्‍ट २०२४ रोजी करण्‍यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नगर विकास विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंद राज, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्‍या अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, जिल्‍हाधिकारी संजय यादव, उप आयुक्‍त (परिमंडळ १) डॉ. संगीता हंसनाळे, डी विभागाचे सहायक आयुक्‍त शरद उघडे आदी या सोहळ्यास उपस्थित होते. या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना ‘तिरंगा प्रतिज्ञा’ दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत १९४२ रोजी याच ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदान येथून ‘चले जाव’ चा नारा देण्यात आला. त्यानंतर स्वातंत्र्या साठीचे हे आंदोलन अधिक व्यापक झाले. लाखो जणांनी आपले प्राण या देशासाठी अर्पण केले. या देशप्रेमाची, शहिदांच्या बलिदानाची आठवण आणि शहीद वीरांप्रती कृतज्ञता म्हणून आपण देशभरात आपल्या राष्ट्रध्वजाविषयी नव्या पिढीत आत्मीयता निर्माण करत आहोत. मागील दोन वर्षात राज्यात घरोघरी तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले. या वर्षी देखील राज्यातील अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार आहे. देशप्रेमाची भावना त्याद्वारे जागवली जाणार आहे. विविध दुकाने, आस्थापना यांच्यावरही तिरंगा फडकवला जाणार आहे. आपल्या राष्ट्रध्वजातील केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग त्याग, धैर्य, प्रेम, शांतता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत. नव्या पिढीत हीच प्रेरणा आणि विश्वास निर्माण करण्याचे काम घरोघरी तिरंगा अभियान करणार आहे. अधिक उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे करून राज्यभरात देशभक्तीचा मळा फुलणार आहे आणि देशप्रेमाचा सुगंध वाहणार असल्याचे मुख्‍यमंत्री महोदय म्‍हणाले.

घरोघरी तिरंगा अभियानादरम्‍यान प्रत्‍येक गावात, शहरात फेरी, पदयात्रा, तिरंगा सेल्फी, स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार अशा माध्यमातून अभियान साजरे केले जाणार आहे. सर्वांच्या सहकार्यातून हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करतच राज्यात विकास आणि कल्याणकारी योजनाच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करण्याचे काम राज्य शासन करत असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. आपल्या खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत विविध पदके मिळवून तिरंगा फडकवला, याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे. महाराष्‍ट्राच्‍या स्वप्नील कुसाळे यांच्यासह नीरज चोप्रा, मनू भाकर, हॉकी संघाने पदक पटकावले. ही खरोखरच अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्‍हणाले.

अपर मुख्य सचिव विकास खारगे प्रास्‍ताविकात म्हणाले की, देशभरात घरोघरी तिरंगा अभियान राबविले जात आहे. राज्यातही मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हे अभियान साजरे केले जात आहे. या अभियानात मागील दोन वर्षा प्रमाणेच आपले राज्य आघाडीवर राहील.

कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री शिंदे आणि इतर मान्यवरांनी हुतात्मा स्मृती स्तंभास अभिवादन केले. कार्यक्रमानंतर पदयात्रा आणि सायक्लोथॉन यात्रेस मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तिरंगा कॅनव्हास वर स्वाक्षरी केली आणि त्याठिकाणी असलेल्या घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी देखील घेतली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -