मुंबई : मुंबईत घराच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे अशक्य होते. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सिडकोसह (Cidco) म्हाडाच्या (Mhada Lottery) घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. त्यामुळे दरवर्षी म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर मिळण्यासाठी विविध भागात घरे उपलब्ध करुन दिली जातात. काही दिवसांपूर्वी म्हाडा मुंबईत तब्बल २०३० घरांची लॉटरी काढणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याबाबत म्हाडाकडून आता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया देखी सुरू करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाने यंदा मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल, वडाळा, पवई, विक्रोळी, शिवधाम मालाड या भागातील घरांचा समावेश सोडतीत केला आहे. तर आज दुपारी १२ वाजल्यापासून म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
दरम्यान, या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३५९ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ६२७ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी ७६८ घरे, उच्च उत्पन्न गटासाठी २७६ घरे उपलब्ध आहेत.
अर्ज कसा भरावा?
IHLMS 2.0 या ॲपच्या सहाय्याने म्हाडा लॉटरीसाठी सहभाग घेता येणार आहे. त्याचरोबर https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क
म्हाडाचा अर्ज भरताना उमेदवारांना ५०० रुपये + जीएसटी @ १८% म्हणजे ९० रुपये, एकूण ५९० रुपये अर्ज शुल्क लागणार आहे. हा अर्ज शुल्क विना परतावा आहे.