Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Keshavrao Bhosale Natyagruha : कोल्हापूरचे नाट्यगृह पुन्हा नव्याने उभारणार!

Keshavrao Bhosale Natyagruha : कोल्हापूरचे नाट्यगृह पुन्हा नव्याने उभारणार!

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आश्वासन


काल अचानक लागलेल्या आगीत नाट्यगृह जळून खाक


कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur) काल रात्री साडेआठच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. कोल्हापूर येथील १०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला (Keshavrao Bhosale Natyagruha) काल अचानक आग लागली. या आगीत नाट्यगृह जळून खाक झाले. राजर्षी शाहू महाराज रोम येथे गेले असता तेथील नाट्यगृह पाहून त्या पद्धतीचं नाट्यगृह त्यांनी कोल्हापूरमध्ये बांधून घेतलं होतं. त्यामुळे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीत या नाट्यगृहाचा फार मोठा वाटा आहे. हे नाट्यगृह जळून खाक झाल्यामुळे नाट्यसृष्टीतून प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushriff) यांनी पुढाकार घेत नाट्यगृह पुन्हा एकदा नव्याने उभारणार असल्याचे आश्वासन दिले आहे.


कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट देत नाट्यगृहाची पाहणी केली. हे सर्व दृश्य पाहून त्यांना देखील प्रचंड दुःख झाले. हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, 'हे नाट्यगृह आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रात्री मी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून रेल्वेने येत असताना प्रवासातच उशिरा मला ही घटना सोशल मीडियावर समजली. आगीची ती दृश्ये मनाला अत्यंत अस्वस्थ करणारी आणि वेदना देणारी होती.'


पुढे ते म्हणाले, 'दोन दिवसांतच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दुर्घटनेबद्दल त्यांच्याशी चर्चा करून या नाट्यगृहाच्या नवीन उभारणीसाठी जास्तीत जास्त निधीसाठी प्रयत्नशील राहू आणि हे वैभव पुन्हा मोठ्या ताकदीने उभारण्यासाठी प्रयत्न करू.', अशी ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment