Friday, October 31, 2025
Happy Diwali

माणसांच्या घुसखोरीमुळे पर्यावरणातील जैव साखळीच धोक्यात

माणसांच्या घुसखोरीमुळे पर्यावरणातील जैव साखळीच धोक्यात

प्रदेशानुसार देशात आढळतात नागराजाच्या वेगवेगळ्या छटा

प्रशांत सिनकर

ठाणे : जंगल परिसरात वन्यजीवांच्या अधिवास असला तरी माणसांच्या घुसखोरीमुळे जैव साखळीच धोक्यात आली आहे. भारतात नागाचे चार प्रमुख प्रकार असून, त्यांच्या तऱ्हा वेगवेगळ्या आहेत. बंगालमध्ये आढळणारा मोनोक्लेड नाग सर्वाधिक मोठा सात फूट लांबीचा असून त्याचे आवडीचे खाद्य मासे आहे, तो शत्रूवर विषारी लाळ फुत्कारतो तर ब्लॅक कोब्रा हा नाग सर्वात विषारी आहे.

श्रावण महिन्यातील नागपंचमीला नागाचे पुजन केले जात असताना, साप माणसाचा शत्रू की मित्र हा एक कायमच संशोधनाचा विषय बनला आहे.

ठाणे मुंबईत दिसणारा चष्मेधारी नाग देशात सर्वत्र आढळतो; परंतु देशात आणखी तीन ते चार प्रकारचे नाग आहेत. बंगालमध्ये आढळणारा मोनोक्लेड (बंगाल नाग) साधारण सर्वात मोठा नाग असून, हा सात फूट लांबीचा आहे. पिवळ्या रंगाचे आडवे पट्टे असतात, त्याच्या आवडीचे खाद्य मासे असून उंदीर, घुशी, बेडूक, छोटे प्राणी यांना खातो. काहीवेळा शत्रूवर विषारी लाळ फुत्कारतो. ही लाळ जखमेवर पडल्यावर विषाचा प्रादुर्भाव शरीरावर होत असल्याची माहिती सर्पतज्ज्ञ अनिल कुबल यांनी दिली.

सेंट्रल एशियन कोब्रा याला ब्लॅककोब्रा म्हणूनही ओळखले जाते. हा नागांमध्ये सर्वाधिक विषारी नाग असून, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू, राजस्थान, दार्जिलिंग आदी भागात आढळतो. तर अंदमान कोब्रा काळ्या रंगाचा असून त्याच्यावर सफेद आडवे पट्टे असतात.

किंगकोब्रा (नागराज) हा नागासारखा दिसतो. मात्र नागकुळातला नाही. विषारी सापात हा सर्वात लांब असून सुमारे १२ ते १८ फूट लांबीचा आहे. गोव्यापासून सर्व दक्षिण भारत आणि पूर्व भारतात आढळतो.

नागाच्या मिलनाच्या वेळी नागीण विशिष्ट स्राव सोडून पुढे जात असते. स्त्रावाचा मागोवा घेत नाग पाठीमागून येत असतो, या काळात नागीणीला मारले तर त्या स्त्रावाच्या शोधात नाग येतो आणि आपल्याला वाटते नागाने डुक धरला. नागाला पाच ते सहा फुटांपर्यंत दिसते. नागाच्या डोक्यावर एखादी गाठ झाली असेल तर ही गाठ म्हणजे नागमणी असल्याची काहींची समजूत आहे, असे ठाणयातील सर्पतज्ज्ञ अनिल कुबल यांनी म्हटले.

Comments
Add Comment