Sunday, June 22, 2025

सुसंवाद

सुसंवाद

अर्जुनाला भानावर आणण्यासाठी श्रीकृष्णांच्या कथनात अर्जुन पूर्णपणे बुडून गेले होते. अर्जुन श्रीकृष्णांशी एकरूप झाले आहेत. सर्वज्ञ श्रीकृष्णांनी जाणले की याला ‘आपण अर्जुन आहोत’ हे भानावर आणून देण्यासाठी श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यातील सुसंवादातील हे नाट्य निर्माण करणाऱ्या ज्ञानदेवांच्या प्रतिभेला मनोमन नमन! 


ज्ञानेश्वरी - प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


आम्ही जसे आणि ज्या रीतीने हे सिद्धान्त कानांच्या स्वाधीन केले तसे त्यांनी तुझ्या चित्ताचे स्वाधीन केले ना?’ ओवी क्र. १५४१
‘अथवा, त्यांनी (कानांनी) मध्येच वाटेत पाडले किंवा तू चालढकल करून झुगारून दिलेस?’ ओवी क्र. १५४२
‘जसे आम्ही सांगितले तसेच जर तुझ्या हृदयात त्यांनी पोचते केले असेल, तर जे मी तुला आत्ता पुसेन ते सत्त्वर सांग.’
ओवी क्र. १५४३


आम्ही जैसें जया रीती ।
उगाणिलें, कानांच्या हातीं।
येरीं तैसेंचि तुझ्या चित्तीं ।
पैठें केलें कीं ॥’
‘अथवा माझारीं । गेलें सांडीविखुरी ।
किंवा उपेक्षेवरी । वाळूनि सांडिलें?’
हे उद्गार कोणाचे? साक्षात श्रीकृष्णांचे. कोणाला उद्देशून? त्यांचा लाडका भक्त, शिष्योत्तम अर्जुनाला उद्देशून. त्यांच्या तोंडी हा संवाद घालणारे अर्थात श्रीज्ञानेश्वर. अठराव्या अध्यायाचा समारोप होतो आहे. त्याप्रसंगी ज्ञानदेवांनी असे सुंदर संवाद लिहून श्रीकृष्ण-अर्जुन नातं जिवंत केले आहे.


श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. तो व्यासमुनींच्या अलौकिक प्रज्ञेने सूत्रमय रूपात गीतेतून दिला. ज्ञानदेवांनी हा ग्रंथ मराठीत आणताना (सर्वसामान्यांसाठी) त्यात काव्य, नाट्य यांची मेजवानी दिली आपल्या प्रतिभेने. याची साक्ष ‘ज्ञानेश्वरी’ वाचताना वारंवार पटते. खरं तर वाचताना नव्हे, ज्ञानेश्वरी अनुभवताना येते. ‘इंद्रियांच्या पलीकडील गोष्टी मी इंद्रियांच्या द्वारे अनुभवायला देईन,’ ही त्यांची प्रतिज्ञा म्हणून सार्थ होते.


आता वरील प्रसंगच पाहा ना! एखादा गुरू आपल्या शिष्याला विचारतो, ‘तू नीट ऐकलंस की नाही?’ इथे माउलींनी श्रीकृष्णांच्या ठायी अशा गुरूची कल्पना केली की जो शिष्याला असं विचारेल. म्हणून देव असणारे श्रीकृष्ण इथे सच्चा गुरूच्या रूपात दिसतात. पुन्हा ज्ञानदेवांची प्रतिभा ही संवाद योजना, शब्दलावण्य यात दिसून येते. ‘तू नीट ऐकलंस का?’ हा झाला साधा संवाद. ज्ञानदेव श्रीकृष्णमुखाने काय म्हणतात? ‘आम्ही जसे आणि ज्या रीतीने तुझ्या कानांच्या स्वाधीन केले तसे त्यांनी तुझ्या चित्ताचे स्वाधीन केले ना? बोलणं कानांच्या स्वाधीन करणं आणि कानांनी चित्ताच्या स्वाधीन करणं या कल्पनेत किती काव्यात्मता आहे! एखादी मौलिक गोष्ट आपण एखाद्या व्यक्तीकडे सोपवतो, त्याप्रमाणे इथे कानांचा उल्लेख केला आहे, त्यामुळे कान हा केवळ अवयव वाटत नाही, ती जिवंत व्यक्ती होते.


या संवादातील नाट्य अजून पुढे आहे. ते कसं? ते ऐकूया ज्ञानियांच्या दृष्टीतून! श्रीकृष्ण हे साक्षात परब्रह्म! मग आपण केलेला उपदेश पार्थाला समजला, ही गोष्ट त्यांना कळली नव्हती? कळली होती. मग तरीही ते हा प्रश्न का विचारतात? ज्ञानदेवांची कल्पनाशक्ती सांगते याचे उत्तर. तर अर्जुनाला भानावर आणण्यासाठी श्रीकृष्णांच्या कथनात अर्जुन पूर्णपणे बुडून गेला आहे. तो जणू श्रीकृष्णांशी एकरूप झाला आहे. सर्वज्ञ श्रीकृष्णांनी जाणलं की ह्याला ‘आपण अर्जुन आहोत’ याचं भान आणून देण्याची गरज आहे. ही ओवी अशी ‘याप्रमाणे प्रश्न करून, नाहीसे झालेले अर्जुनपण आणून, अर्जुन पूर्ण दशेस आला किंवा नाही हे त्याच्या मुखातून बोलविले’ ओवी क्र. १५४८


श्रीकृष्ण-अर्जुन संवादात हे नाट्य निर्माण करणाऱ्या ज्ञानदेवांच्या प्रतिभेला मनोमन नमन!


[email protected]

Comments
Add Comment