पुढल्या वर्षापर्यंत अवकाशातच राहण्याची शक्यता
मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता विल्यम्स (Sunita Williams) यांनी ५ जून रोजी अंतराळात तिसऱ्यांदा यशस्वी उड्डाण केलं होतं. त्यांच्यासह त्यांचे सहकारी बुच विल्मोर (Butch Wilmore) देखील होते. या गगनभरारीचं जगभरातून कौतुक करण्यात आलं. मात्र, सुनीता विल्यम्स यांचे अंतराळयान स्टारलाइनरमध्ये (Starliner) तांत्रिक बिघाड झाला असून त्याचे पृथ्वीवर परतणे कठीण झाले आहे. १४ जून रोजी ते पृथ्वीवर परतणार होते, मात्र या बिघाडामुळे ते अद्याप परतू शकलेले नाहीत. यातच एक आणखी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंतराळयानातील बिघाडामुळे या दोघांचाही अवकाश स्थानकातील मुक्काम वाढणार आहे. फेब्रुवारी २०२५ पर्यंत ते अवकाश स्थानकातच राहण्याची शक्यता आहे.
विल्यम्स आणि विल्मोर यांच्या अंतराळयानाचे नाव बोईंग स्टारलाईनर असे आहे. याच अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाला आहे. विशेष म्हणजे बोईंग स्टारलाईनरचे हे पहिलेच उड्डाण होते. तांत्रिक बिघाडामुळे हे अंतराळयान परतण्यासाठी सुरक्षित आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नेमकी समस्या काय?
मिळालेल्या माहितीनुसार विल्यम्स आणि विल्मोर यांनी अंतराळात प्रवास चालू केला होता तेव्हाच बोईंग स्टारलाईनरमधील हेलियम या वायूची गळती चालू झाली होती. यासह या अंतराळायानातील २८ थ्रस्टर्सपेकी ५ थ्रस्टर्स हे निकामी झाले आहेत. विल्यम्स आणि विल्मोर हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात सुखरुप उतरले आहेत. मात्र आता अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे आगामी काही महिने लांबू शकते, असे म्हटले जात आहे.
नासाने नेमकं काय सांगितलं?
आम्ही ही मोहीम चालू केली तेव्ही ती एक टेस्ट मिशन होती. या यानाचे हे पहिलेच उड्डाण होते. त्यामुळे अंतराळातून प्रवास करण्याच्या अनुभवी अंतराळयानाच्या तुलनेत या अंतराळयानातून प्रवास करणे अधिक जोखमीचे ठरू शकते याची आम्हाला कल्पना होती, असे नासाचे अधिकारी केन बोवेरसॉक्स यांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितले. विल्यम्स आणि विल्मोर यांना परतीच्या प्रवासासाठी बोईंग स्टारलाईनर हे अंतराळयान वापरायला द्यावे की नाही, याबाबत नासाच्या शास्त्रज्ञांची वेगवेगळी मते आहेत. पृथ्वीवर परतताना हेलियम वायू गळती तसचेच थ्रस्टर्स निकामी झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत या संशोधकांत एकमत नाही.
अंतराळयानातील तांत्रिक बिघाडामुळे या दोन्ही अंतराळवीरांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातील मुक्काम काही दिवस वाढणार आहे. ते कायस्वरुपी अवकाश स्थानकात राहणार नाहीत. बोईंग स्टारलायनर या अंतराळयानातून परतणे धोकादायक असल्याचे वाटल्यास या अंतराळयानाचे सॉफ्टवेअर अपडेट केले जाईल. या अंतराळयानाला पृथ्वीवर परतण्यासाठी ऑटोनॉमस मोडवर टाकले जाईल. त्यानंतर स्पेसएक्स या कंपनीच्या क्रू ड्रॅगन या अंतराळयानाच्या मदतीने हे दोघेही पृथ्वीवर परततील. क्रू ड्रॅगन हे अंतराळयान सध्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर आहे.
तीनदा रिटर्न पुढे ढकलण्यात आले
दरम्यान, सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांनी ५ जून रोजी स्टारलाईनर या अंतराळयानातून उड्डाण घेतले होते. ते १३ जून रोजी पृथ्वीवर परतणार होते. त्यानंतर ते २६ जून रोजी करण्यात आले. याआधी तीनदा रिटर्न पुढे ढकलण्यात आले आहे. नासाला हे मिशन अत्यंत काळजीपूर्वक, सावधगिरीने पूर्णत्वास न्यायचे आहे. यात त्यांना छोटीशीही चूक करायची नाही. पण या अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते सध्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्थानकात अडकलेले आहेत.
इतिहास घडवणारे दोन अंतराळवीर
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अन्य एका सहकाऱ्यासह तिसऱ्यांदा अवकाशात रवाना झाल्या. यासह या दोघांनी बोईंग कंपनीच्या स्टारलाइनर अंतराळयानात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले सदस्य बनून इतिहास रचला. विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन जाणारे बोईंगचे ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’ अनेक विलंबानंतर फ्लोरिडामधील केप कॅनाव्हेरल अंतराळ केंद्रावरून निघाले. अशा मोहिमेवर उड्डाण करणा-या पहिल्या महिला म्हणूनही विल्यम्स यांनी इतिहास घडवला. मात्र, अद्याप इंजिनियरिंग टीम त्यांच्या परतीच्या प्रवासात येत असलेल्या समस्येचं मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. आता नासासह भारतीयांना देखील सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर परतीची आस लागली आहे.