शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत १ कोटी २७ लाख महिलांचे अर्ज मंजूर
- रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मिळणार सरकारची प्रेमाची ओवाळणी
मुंबई : भाऊ बहिणाला जी भेट देतो त्याला ओवाळणी म्हणतात. बहिणीनं भावाला राखी बांधल्यानंतर जे दिल जातं ते भावाबहिणंच प्रेम असतं भीक नसते पण मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी दिल्लीला जाऊन मुजरे करत तुम्ही जे सोनिया गांधी यांच्या दारात उभे राहिलात ना त्याला खरी भीक म्हणतात, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. रक्षाबंधनाचे पवित्र पर्व सगळीकडे साजरे होत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ महाराष्ट्रातील १ कोटी २७ लाख महिलांच्या खात्यावर थेट जमा होणार असल्याचे डॉ. वाघमारे म्हणाल्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अर्जांची छाननी युद्धपातळीवर सुरु असून रक्षाबंधनपूर्वी जास्तीत जास्त महिलांना योजनेत सामावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे डॉ. वाघमारे यांनी यावेळी सांगितले. वाघमारे पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील आतापर्यंतच्या कल्याणकारी योजनांमध्ये सर्वात लोकप्रिय योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ठरली आहे. संपूर्ण राज्यातून महिलांनी या योजनेसाठी अर्ज सादर केले आहेत, असे डॉ. वाघमारे यांनी सांगितले. या योजनेच्या निमित्ताने महायुती शासनाने दिले महिलांना हक्काचे माहेर आणि लाडक्या बहिणींना मिळणार आता दरमहा मानाचा आहेर, असे डॉ. ज्योती वाघमारे म्हणाल्या.
या योजनेला महिला वर्गाकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे विरोधांकाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. विरोधक योजनेवर चौफेर टीका करत आहेत इतकंच नव्हे तर काही विघ्नसंतोषी लोकांनी कोणाला तरी पुढे करुन कोर्टात देखील ही योजना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र माननीय मुंबई उच्च न्यायालयाने देखील महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमुख धोरणावर शिक्कामोर्तब केले आणि याचिकाकर्त्यांना चपराक दिली असे डॉ. वाघमारे म्हणाल्या.