जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै
या विश्वात सर्व आनंदासाठी आहे. आनंद स्फुरतो व आनंद दिल्यावर तोच आनंद आपल्याकडे परत येतो. जगात सगळीकडे आनंदीआनंद आहे, पण लोक त्याचा स्वाद घेत नाहीत. जीवनविद्येचा हा सिद्धांत लोकांना माहीत नाही. आनंद आपले स्वरूप आहे हे लोक विसरले व नको त्या गोष्टी करत बसले. याचाच परिणाम बघाल तिथे दुःख, सगळीकडे महाभारत आहे असे आपण म्हणतो. हे महाभारत म्हणजे काय? भांडण, तंटेबखेडे! महाभारतातील युद्धामध्ये दोन्ही पक्ष शेवटपर्यंत भांडत राहिले, लढत राहिले, युद्ध करीत राहिले. सर्व कौरव मेले, पांडवांची मुले-बाळे मेली. फक्त पांडव शिल्लक राहिले. परिणाम म्हणजे दुःख. हे मी सांगतो आहे कारण, अशा दुःखाला कारण म्हणजे माणूस आपल्या स्वानंदाला विसरला. परिणामी तो स्वानंदाला मुकला. तो स्वानंद तुमच्या ठिकाणी आहे. त्याचा स्वाद कसा घ्यायचा हे सद्गुरू शिकवतात. आनंद तुझ्याच ठिकाणी आहे. तो किती आहे? अक्षरश: सागर आहे. “तू आनंद समुद्र विश्व लहरी जाणूनी घोटी मुला’’. तू आनंदाचा समुद्र आहेस. समुद्र कधी आटतो का? जसा समुद्र कधी आटत नाही तसे आनंदाचा सागर कधी आटत नाही. आनंद देत राहा. तो कमी होणार नाही उलट वाढेल. आनंद देण्यासाठी आपण जन्माला आलो हे लक्षात ठेवले तर जीवनात सगळीकडे आनंदीआनंद आहे. संतांना साक्षात्कार होतो म्हणजे काय? संतांना प्रथम ज्ञान होते व या ज्ञानातून आनंद होतो. स्वानंदाचे जेव्हा ज्ञान होते, स्वरूपाचे जेव्हा ज्ञान होते तेव्हा जीवाला दिव्यत्व प्राप्त होते.
जीवाला आपल्या शक्तीची जाणीव होते. जीवाला आपल्या आनंदाची जाणीव होते. जीवाला आपल्या स्वरूपाची ओळख होते. ही ओळख महत्त्वाची आहे. “आधी देवासी ओळखावे, मग तयाचे भजन करावे अखंड ध्यानची धरावे पुरुषोत्तमाचे’’. म्हणूनच हा जो परमेश्वर आहे तो आपला मूळ विषय आहे. परमेश्वर म्हणजे आपल्या जीवनाचे केंद्र. केवळ मानवजातीच्या नव्हे तर सर्व प्राणिमात्रांच्या जीवांचे तो केंद्र आहे. तो विषय आपण नीट समजून घेतला पाहिजे. परमेश्वर आहे का विचारले तर काही लोक आहे म्हणतात, काही नाही म्हणतात. हे सगळे जे चालते ते जीवनविद्येला मान्य नाही. जीवनविद्या सांगते परमेश्वर आहे व तो १०० टक्के आहे. तो दिसत का नाही. कारण तो दिसण्याचा विषय नाही. त्याचा तुम्ही अनुभव घ्यायचा असतो. साखर गोड आहे. साखरेतील गोडी दाखवा तर आम्ही ती खाणार असे म्हणालात तर तुम्हाला साखर कधीच खाता येणार नाही. तुम्हाला गोडी अनुभवायची आहे ना मग साखर तोंडात टाका. तसे देव म्हणजे आनंद, परमानंद, ब्रह्मानंद, सहजानंद हा तुझ्याच ठिकाणी आहे. त्याला अनुभवण्यासाठी अभ्यास करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी गुरूशिवाय तरुणोपाय आहे का? काही लोक सांगतात गुरू काही नको. मात्र संत सांगतात, सद्गुरुवाचोनी सापडेना सोय. संत कबिरांनी सद्गुरू महिमा सांगितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी तर कमालच केली आहे.
तुकाराम महाराज सांगतात,
सद्गुरूवाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी
आपणासारिखे करिती तत्काळ, नाही काळवेळ तयालागी
लोह परिसाची न आहे उपमा, सद्गुरू महिमा अगाध
तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरोनी खऱ्या देवा
खरा देव म्हणजे सद्गुरू. प्रत्यक्षात असलेला तो देव खोटा नाही. तो देव खराच पण तो देव सद्गुरू दाखवितात म्हणून सद्गुरू हाच खरा देव. म्हणून सद्गुरूंना शरण जायचे की न जायचे
जीवनाचा शिल्पकार”.