Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीघुंगुरवाळा कर्माचा

घुंगुरवाळा कर्माचा

ऋतुराज – ऋतुजा केळकर

बरेचदा असं होतं की, आपण आपल्या समोरच्याच्या किंवा कधी कधी आपल्या स्वतःच्या एखाद्या कृतीबद्दल खूप विचार करत राहतो. कसे आहे ना की, झाडावरच्या फुलांचेच पाहा. ओंजळीतील ती फुले आपण देवाला वाहिल्यानंतर आपण संपूर्ण दिवसभर त्यांचा सुगंध, त्यांचा टवटवीतपणा हा आपल्यासोबत घेऊन वावरतो. पण दुसऱ्याच दिवशी त्याचे झालेले निर्माल्य सहजगत्या बाजूला सारून नव्याने देवाला नवीन फुले वाहतो. अगदी तसेच आपल्याला करता आले पाहिजे. मान्य, कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही.

मानवी जीवनात दुःखाची भरजरी वस्त्र करून भोग भोगणाऱ्या शरीराला विरक्ती, वियोग, विरह, पुनर्मिलन आणि यांसारख्या भावनांची ठिगळे लावून आपल्या आत्म्यावर ओढून बसलो तर कर्माची पोतडी कधीच रिती होणार नाही. मान्य आहे की, ऋतुभारणीच्या पायाभरणीला भावनांच्या ‘या’ चिऱ्यांमुळे आत्म्याच्या कळसाचा तोल ढळतोच ढळतो पण म्हणून जर आपण या जीवनाच्या पाऊल वाटेवर वळणावळणावर उभ्या असलेल्या अनुभवांच्या चैत्रबनांचा स्वीकार न करता भूकंपाप्रमाणे तडकत राहिलो तर मात्र, अंगी दैवत्व असूनही कांचनमृगाला क्षणीक भुलून आयुष्याच ‘रामायण’ करणाऱ्या सीतेसारखे आयुष्य जगावे लागेल. मग आयुष्याच्या रंगलेल्या डावाचा जुगार व्हायला वेळ लागणार नाही.

म्हणूनच समोरचा काय करतो किंवा आपण एखाद्या प्रसंगात कसे वागलो? काय निर्णय घेतला? यातून आपल्या जीवनाच्या रेशमी वस्त्रावर एक अनुभवाची झगमगत्या सुरेख सोन्याच्या तारेची कलाकुसर घालून पुढील क्षणी विण विणायला घ्यायला हवी. न की, मग असे झाले असते तर बरे झाले असते किंवा ते तसे केले असते तर बरे झाले असते…!!

म्हणून त्याचे गेल्या क्षणातच अडकून राहून कुढत राहावे. जसा गेलेला क्षण परत येत नाही म्हणूनच, आजचा वर्तमान असा घडवला की येणारा भविष्यकाळ हा भूत, भविष्य आणि वर्तमान यांचे सोनेरी जोडदुवे ठरतील. आता कृष्णाचेच पाहा ना, प्रथम गुन्हा केल्यानंतर ताबडतोब शासन करण्याची ताकद असते; परंतु शंभर गुन्हे माफ करण्याची ताकद तो अंगी ठेवतोच. कारण त्याने समोरच्याला सुधारण्याची संधी दिली. कसे आहे ना, मुक्तीच्या पायवाटेवर टाकलेले पाऊल हे देहाच्या अनेकानेक षङरिपूच्या ठेहेरावांतून अडकत अडकत जाते. या शोध वाटेवर देहाच्या गंधसुगंधाची राने मानवी मेंदूला भुरळ घालतच असतात. या दुष्कर्मांच्या कर्मकांड, जातीयवाद, द्वेष, घृणा या आणि यासारख्या हिंगमुठी कधी परिस्थिती तर कधी आजूबाजूचे हितचिंतकांचे बुरखे पांघरलेले विघ्नसंतोषी, आपल्या बहरलेल्या चैतन्यपूर्ण जीवनाच्या औदुंबराच्या मुळाशी घालतच असतात. म्हणूनच मृत्यू हे मुक्तीचे द्वार आहे हे ज्याच्या ध्यानात येईल. तसेच ज्याला मुक्तीचा ध्यास लागेल तोच या देहधारणेतील कल्पविकल्प समजून घेऊन, आत्मशोधाच्या मार्गावरून पुढे जाण्यात यशस्वी ठरेल. शेवटी माझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर…

“आठवू नको आटलेली नदी…
अन् मृगतृष्णेची भुली…
घुंगुरवाळा एक कर्माचा …
वाट साजिरी असे मुक्तीची…
वाट साजिरी असे मुक्तीची…’’

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -