सीबीआयने सापळा रचत केली कारवाई
नवी दिल्ली : सध्या राजकीय वर्तुळामध्ये ईडी या नावानेच भल्याभल्या नेत्यांना घाम फुटत आहे. ईडीच्या धाडी पडल्याने अनेक नावाजलेल्या राजकारण्यांना तुरुंगवारी झाली असून अजूनही काही जण गजाआड आहेत. परंतु देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत लाचखोरीच्या प्रकरणात लाच घेताना ईडीचा मोठा अधिकारी पकडला गेल्याने नवी दिल्लीच्या वर्तुळात ‘’शिकारी खुद्द यहाँ शिकार बन गया’ असे बोलले जाऊ लागले आहे.
गेल्या काही वर्षात देशभरातील सीबीआय आणि ईडीची कारवाई हा विषय चांगलाच चर्चेत राहिला आहे. सीबीआय आणि ईडीच्या कारवाईसंदर्भात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही पाहायला मिळाले. मात्र, आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने ईडीच्या सहाय्यक संचालकालाच लाचखोरीच्या प्रकरणात अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
राजधानी दिल्लीत तब्बल २० लाखांची लाच घेताना ईडीच्या सहाय्यक संचालकाला अटक करण्यात आली आहे. ईडीच्या सहाय्यक संचालकाला लाच घेताना अटक करत सीबीआयने मोठी कारवाई केली. संदीप सिंह यादव असे अटक करण्यात आलेल्या ईडी अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीतील लाजपत नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. मात्र, ईडीचा सहाय्यक संचालकच लाच घेताना पकडल्यामुळे दिल्लीत मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या अधिकाऱ्याने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एका व्यावसायिकाकडून तब्बल २० लाख रुपयांची मागणी केली होती. ही २० लाखांची लाच स्वीकारताना ईडीच्या सहाय्यक संचालकाला रंगेहात पकडण्यात आले आहे. ईडीमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात एका ज्वेलर्सच्या मुलाला दिलासा देण्याच्या बदल्यात ही लाच या अधिकाऱ्याने मागितली असल्याचे सांगितले जात आहे. ईडीच्या सहाय्यक संचालकाने एका व्यावसायिकाकडून २० लाखांची लाच मागितल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. या तक्रारीनंतर सीबीआयने तात्काळ सापळा रचत ईडीच्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी आता लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती देण्यात येत आहे.