Sunday, November 16, 2025

Ajit Pawar: अजितदादा म्हणाले, शेतीचं वीजबिल भरू नका, वायरमन आला तर माझं नाव सांगा!

Ajit Pawar: अजितदादा म्हणाले, शेतीचं वीजबिल भरू नका, वायरमन आला तर माझं नाव सांगा!

थकबाकी असलेले बिल देखिल भरण्याची गरज नाही

दिंडोरी : राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर विरोधकांनी लाडक्या भावाला काहीच मिळाले नाही, अशी ओरड सुरु केली. मात्र, आम्ही लाडक्या भावांसाठीही योजना सुरु केली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचं वीजबिल भरावं लागणार नाही. तसेच आतापर्यंत थकबाकी असलेले बिल देखिल भरण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे यापुढे शेतकऱ्यांना वीजेसाठी अवलंबून राहावे लागणार नाही. सौरउर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौरपंपाचा वापर करुन आता शेतीला पाणी देता येईल. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे, असा दावा उफमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला. ते गुरुवारी दिंडोरी येथे जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसोबत लाडक्या भावांनाही साद घालण्याचा प्रयत्न केला. राज्यातील शेतकऱ्यांना आता शेतीसाठीच्या वीजेचे बील भरावे लागणार नाही. कारण आपण सौरपंपाची योजना सुरु केली आहे. त्यामुळे आतापर्यंत शेतीच्या पंपाचे आलेले बिल भरण्याची गरज नाही. यापुढेही हे बिल भरावे लागणार नाही. कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आला तर त्याला सांगा अजितदादाने सांगितलंय.

मी १० वर्षे राज्याचा अर्थमंत्री राहिलो आहे, मी १० अर्थसंकल्प मांडले आहेत. त्यामुळे कुठे बचत करुन योजनेला पैसे देता येतात, हे मला माहिती आहे. विरोधक म्हणतात की, लाडकी बहीण योजना औटघटकेची आहे. मात्र, पुढील पाच वर्षे ही योजना सुरु राहील, हा अजितदादाचा वादा आहे, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी उशीर होत आहे. पण महिलांना त्यांचा हक्क मिळेल. त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. आमचा प्रयत्न आहे की, १७ ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्याच जमा करावेत. आतापर्यंत सव्वा कोटी महिला योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. हा आकडा १७ तारखेपर्यंत दीड ते दोन कोटींवर जाईल. कालच मी ६००० कोटी रुपयांच्या फाईलवर सही करुन आलोय. ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या पैशातून तुमच्या स्वत:साठी काहीतरी घ्या. लाडक्या बहि‍णींनी पैसे खर्च केल्यास बाजारपेठेला उठाव मिळेल, असा दावा अजित पवार यांनी केला.

Comments
Add Comment