माझे कोकण – संतोष वायंगणकर
महाराष्ट्रात या वर्षाच्या हंगामात पाऊस चांगलाच झाला आहे. शहरांना पाणीपुरवठा करणारी जवळपास राज्यातील सर्व पाणी साठवण करणारी धरणे ओव्हरप्लो झाली आहेत. यामुळे भविष्यात उन्हाळ्यात भासणारी पाणीटंचाई कमी होईल, असे आताच्या पाण्याच्या पातळीवरून वाटतं. अर्थात या पुढच्या काळात मुंबई, पुणे, नाशिकसारख्या शहरांमध्ये पाणीटंचाईचे संकट येईल का? आणि कसे हे आताच्या पाणी पातळीवरून ठरवणे कठीण आहे. मात्र, आताच्या घडीला शहरी भागांना दिलासा देणारी स्थिती आहे. जवळपास एक-सव्वा महिना पाऊस थांबला नाही. कधी वादळी पाऊस तर कधी संततधार असणारा पाऊस कोकणात होतच आहे. कोकणात वादळ आले तरीही अनेक गावातील घरांना धोका संभवत असतो. ग्रामीण भागातील अनेक मार्गांवर वृक्ष कोसळत असतात. हे चित्र जवळपास प्रत्येक वर्षी कोकणात पाहायला मिळते. पावसाळी हंगामात विशेषकरून काजू, आंबा बागायतीची कामे असतात आणि त्याचबरोबर भातशेतीही मोठ्या प्रमाणावर केली जाते. भातशेती फायद्यात की तोट्यात याची चर्चा आजही कोकणातील गावा-गावांतून होताना दिसते.
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य शेतात राबण्याच्या मानसिकतेचे आहेत त्या कुटुंबाची भातशेती व्यवस्थितरीत्या करता, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन बियाण्यांचा वापर करून चांगलं भातपीक घेणारे शेतकरीही आता कोकणात आहेत. कोकणातील तरुणांना कष्ट करायला नको. काम नको असे मधल्या काळात फारच सगळीकडे चर्चा होत होती; परंतु आज हेच कोकणातील चित्र बऱ्यापैकी बदललेले दिसतेय. अनेक गावातील तरुण वेगवेगळे प्रयोग शेतीतही करताना दिसतात. अननस फक्त दोडामार्ग भागातच होतं असं नाही. देवगड, कुणकेश्वरलाही अननस होतो. कुणकेश्वरच्या कणेरकर यांनी आपल्या आंबा बागायतीतही अननसाची लागवड करून अननस पिकवलेय. जरी फार मोठ्या प्रमाणावर अननसाची लागवड त्यांनी केली नसली तरीही दोनशे अननस आंबा बागायतीत लावण्याचा प्रयोग कणेरकर या तरुणाने कुणकेश्वरमध्ये केला आहे.
नारळ, पोफळीच्या बागांमध्ये मिरीची लागवड ते वेल सोडण्याची पद्धती आपणाकडे फार पूर्वीपासून आहे. काही भागात मोठ्या प्रमाणात मिरीची लागवड केली जाते. मोठ पीकही या मिरचीच घेतले जाते. बागायतीतूनही ते उत्पादन घेता येईल ते प्रयोग कोकणातील शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजेत. त्यासाठी वाट पाहत बसण्याची आवश्यकता नाही. नवीन प्रयोगातून त्यातूनही आर्थिक फायदा होणाराच आहे. कोकणात भातपीक होते, काही भागातून हळवी शेती होते. तर काही भागातून डोंगरभागातही नाचणी, भात अशीही शेती लागवड केली जाते. अलीकडे पुन्हा एकदा कोकणातील लाल तांदूळ मोठ्या प्रमाणात त्याला मागणी आहे. कोकणातील या वालय जातीच्या तांदळाला विशेषकरून तांदळाच्या पेजेसाठी मोठी मागणी आहे. आठवडा बाजारच्या दिवशी कोकणातील या ‘गावठी’ उत्पादनाला चांगली मागणी असते. आज जरी नव-नवीन भात बियाण्यांची पेरणी अधिक प्रमाणात होत असली तरीही काही भागात पारंपरिक बियाण्यांची पेरणी करूनही शेती केली जाते. यावर्षी अधिकच्या पावसाने अनेक भागातील शेती पाण्याखाली गेली आहे. खाडी किनाऱ्यावरील भात लागवडही पाण्याखाली गेली आहे. ज्यांची कोवळी भात लावणी झाली असेल तर त्यांना या मोठ्या प्रमाणावर कोसळलेल्या पावसाने पाण्याखाली भात शेती राहिल्याचे भात कुजले अशी शेतकऱ्यांतून होणारी चर्चा एेकावयास मिळते. अधिकच्या पाण्याने शेतात रान वाढण्याचे प्रमाणही अधिकच आहे.
शेतीला अधिकचा होणारा पाऊसही पूरकच असतो; परंतु संततधार महिनाभर कोसळणारा पाऊस असेल तरी तो मारक ठरणाराच आहे. यातून एकच घडलं माळरानावरती पाणी नाही. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याला पुरेस पाणी माळरान, डोंगरावरच्या शेतीसाठी मिळू शकले. यामुळे डोंगर माथ्यावरची जी शेती आहे ती शेती अधिक चांगली होत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, जी भातशेती यावेळी झालेल्या अधिकच्या पावसाने पाण्याखाली गेली आहे. त्या शेतीचे काय होईल हे आज ठरवणं अवघड आहे. शेतामध्ये अधिक पाणी असल्याने खतांचा वापरही करता येत नाही. भातशेतीवर मारलेलं खत पावसाबरोबर वाहूनही जाण्याची शक्यता अधिक असते. यावेळच्या पावसाने तीच स्थिती निर्माण झाली. या अधिकच्या पावसाने कोकणातील जो शेतकरी पालेभाजी आणि अन्य भाजी उत्पादित करतो त्या शेतकऱ्याचेही यावर्षी नुकसान झाले आहे. पालेभाज्या तर शेतातून ग्राहकांपर्यंतही घेऊन जाणे अवघड झाले आहे. ही पालेभाज्यांची स्थिती आहे. यावेळी कोकणातील शेतकरी आजच्या घडीला तरी अडचणीत आहे. मात्र, भात चांगला पिकेल या आशेवर कोकणातील शेतकरी असतो. भात कापणी होऊन भात घरात आल्यावर ‘गेल्या वर्षाक भातपीक बरा होता. या वर्षाक काय खरा नाय’ हे ठरलेलं वाक्य दरवर्षीप्रमाणे जर कोणाच्या कानी पडलं तरीही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही; परंतु काही शेतकरी मात्र अगदी गावच्या ग्रामदेवतेची शपथ घेऊन यावर्षी चांगलं पीक झालं. देवाने तारल म्हणून सांगायलाही विसरत नाहीत. पण काहीही झालं तरी कोकणातला शेतकरी कधी नुकसानीचं रडगाणं घेऊन घेऊन शासनदरबारी कधी जात नाहीत. मिळालं तर ठीक नाही मिळाल तरीही नव्याने शेतीत रमतात. हे कोकणातील शेतकऱ्यांचे वैशिष्ट्य आहे.