मागील लेखात आपण टॉक्सिक व्यक्तिमत्त्व म्हणजे काय, त्यांची लक्षणं कोणती याविषयी माहिती घेतली. आता आपण आपल्या घरात, नात्यात, कार्यालयात, ओळखीत ज्या ज्या लोकांशी आपला संपर्क, संबंध येतो आपल्याला दैनंदिन ज्यांच्याशी कामे पडतं, बोलावे लागतं पण त्यातून फक्त मनस्ताप होतो आणि आपला वेळ, दिवस खराब होतो, आपला मूड जातो, आपली मनस्थिती बिघडते अशा टॉक्सिक नातेसंबंधाबद्दल जाणून घेणार आहोत. अनेकदा आपल्याला इच्छा नसतानाही काही लोकं आपल्या आयुष्यात नातेवाईक म्हणून, कौटुंबिक संबंध म्हणून आलेले असतात. मित्र-मैत्रिणी, शेजारी, सहकारी याबद्दल आपल्याला न पटल्यास, न आवडल्यास त्यांच्यापासून आपण अलिप्त होऊ शकतो, लांब राहू शकतो, यात आपण इतर पर्याय शोधू शकतो. असे टॉक्सिक नातेसंबंध सांभाळत बसणे आपल्याला बंधनकारक नसते. या उलट नातेवाईक, घरातील लोक, अगदी आई-वडील, बहीण- भाऊ, दीर, नणंद, सासू, सासरे, मुलं स्वतःच्या अगदी जवळची लोकं, सहकारी, शेजारी यांच्यापासून मात्र कोणीही सहजासहजी वेगळं होऊ शकत नाही कारण अनेक नातेसंबंध, कुटुंब, समाज, घरातील ज्येष्ठ लोकं, लहान मुलं या सगळ्यांचा विचार करून, भविष्याचा विचार करून टिकवले जातात.
आपल्या घरात, रक्ताच्या नात्यात जर काही व्यक्ती खूप टॉक्सिक असतील, आपल्याला मनस्ताप देणाऱ्या, आपली मानसिकता खराब करणाऱ्या असतील, तर मात्र या लोकांना कसं वेळीच ओळखायचं, अशा लोकांशी कसं वागायचं, स्वतःला होणारा त्रास कसा कमी करायचा याबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. आता आपल्याच घरातील, नात्यातील कोण आपलं खरंच हितचिंतक आहे, शुभचिंतक आहे, कोणाला आपण मनापासून आवडतोय, कोण आपला आदर करत आहे? कोणाचं आपल्यावर खरं प्रेम आहे, आपुलकी आहे? कोण आपल्यावर जळतं, कोणाला आपलं वाटोळं झालेलं पाहायचं आहे, कोण आपल्या तोंडावर गोड बोलतं पण आपल्या मागे आपल्याला बदनाम करण्यात सक्रिय असते हे पहिले समजावून घ्या. तुम्ही दुःखी असल्यावर कोणाला मज्जा वाटते, तुमच्यासोबत वाईट घडलं, तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला अपमानित करण्यात आल्यावर कोण फक्त गंमत बघत राहतं याचं निरीक्षण करा. तुम्हाला टॉर्चर करण्याची संधी कोण शोधत असते, तुम्हाला सतत घालून पाडून बोलणं, तुमच्याशी कायम खोटं बोलणं, तुमच्या चांगल्या बोलण्याचा पण विपरीत अर्थ काढणं, तुम्हाला अपमानित होताना पाहणं यात कोण कायम पुढे असते हे जाणून घ्या. तुम्हाला टोमणे मारण्यात, तुम्हाला पाहून तोंड वेंगडण्यात, विचित्र हावभाव करण्यात कोण पुढे असते हे तपासा.
आपल्या जवळील, नात्यातील अनेक लोकं अशी असतात ज्यांना आपला त्रास, आपलं दुःख, आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी माहिती असतात तरी ते आपल्याला त्या सहन करायला, स्वीकारायला भाग पाडतात. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्यावर त्यांच्या सोईनुसार गोष्टी लादणे त्यांना आवडतं. आपली कधी मजा घेता येईल, चेष्टा करता येईल, आपल्या जखमेवर कसं मीठ चोळता येईल याची हे नातेवाईक वाटच पाहत असतात. त्यामुळे आपला वीक पॉइंट, कमकुवत बाजू लक्षात ठेवून त्यावर आपली खिल्ली कोण उडवतं याचं निरीक्षण करा.अगदी आपला डीपी, आपला फोटो, स्टेट्स, एखादी पोस्ट, एखादा मेसेज, व्हीडिओ, आपले कपडे, आपलं दिसणं, राहणं, वागणं बोलणं, आपल्या सवयी यावर सतत टीकाटिप्पणी कोण करत हेही लक्षात ठेवा.
काही जण तुम्हाला विनाकारण छेडत असतात. घरातील, बाहेरील कोणताही विषय घेऊन तुमचा संबंध असो किंवा नसो ते तुम्हाला त्यात ओढतात, तुम्हाला खूप संताप येईल, राग येईल, तुमचा दिवस खराब होईल असं काहीतरी ही लोकं प्रत्यक्ष, फोनवर अथवा मेसेज करून तुम्हाला डिवचतात. अशी टॉक्सिक लोकं प्रचंड नकारात्मक असतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात सगळं काही चुकलेलं असतं, मनाविरुद्ध घडलेलं असते, त्यांना स्वतःच्या आयुष्यात खूप तडजोड करावी लागलेली असते म्हणून प्रत्येक नात्याकडे, प्रत्येक नात्यातील व्यक्तीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नकारात्मक आणि कलुशीत झालेला असतो. अशा लोकांच्या स्वतःच्या आयुष्याला काहीच अर्थ राहिलेला नसतो, करण्यासारखं काहीही भविष्य नसतं, सगळं अंधारात असतं त्यामुळे ते इतरांमध्ये काहीना काही कमतरता शोधून त्याच्या खोड्या काढत असतात. इतरांना कमजोर करणे, इतरांना मूर्ख, नालायक ठरवणे, वेड्यात काढणे, इतरांना दोष देणे, इतरांच्या कोणत्याही गुणांची, चांगल्या गोष्टीची दखल न घेता त्यात चुकीची शेरेबाजी करणे, सगळं जग एकीकडे आणि ही लोकं एकीकडे असा यांचा प्रकार असतो. यांना कोणा मध्येच काही चांगलं दिसत नसतं अगदी घरातील लहान मुलांपासून ते मृत पावलेल्या ज्येष्ठ व्यक्तींवर सुद्धा ही लोकं आगपाखड करत असतात.
हे लोकं स्वतःला मात्र परिपूर्ण समजतात. आपण अगदी स्वयंभू आहोत, स्वतःला देवाचा अवतार समजणे, साक्षात सत्य न्याय सामंजस्य पावित्र्य नीतिमत्ता याची परिपूर्ण मूर्ती समजणे आणि इतरांना त्यांच्या चुका, दुर्गण, अपराध याबद्दल प्रमाणपत्र देणे यामध्ये ही लोकं कायम पुढे असतात. स्वतःच्या आयुष्यातील नैराश्य, कमतरता, स्वतःचे अपयश, स्वतःचं झालेलं नुकसान, स्वतःचं न घडलेलं, न बनलेलं आयुष्य त्यामुळे भोगलेला अथवा भोगावा लागत असलेला त्रास यातून त्यांचा असा स्वभाव तयार झालेला असतो. अशा लोकांच्या बालपणापासून ते आजतागायत त्यांना कोणी किंमत दिलेली नसते, त्यांचा स्वभावच त्यांचा शत्रू बनलेला असतो त्यामुळे कोणीही त्यांना विचारात घेतलेले नसतं. अशा वेळी स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी, आपण पण कुटुंबाचा भाग आहोत हे दाखवण्यासाठी या लोकांची ही कसरत चाललेली असते.
कितीही जवळचे नाते असले तरीही प्रत्येकाचे आयुष्य, नशीब वेगवेगळे असते. प्रत्येकाचे वैयक्तिक सुख-दुःख, कर्तृत्व, यश-अपयश हे ज्याच्या त्याच्या मेहनतीवर, प्रयत्नावर, त्याच्या कर्माने त्याला मिळत असते; परंतु टॉक्सिक व्यक्ती त्याच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या ही इतरांमुळे आली असंच समजून वागते-बोलते. आपल्या स्वतःच्या चुकीची, स्वतःच्या अपयश, चुकलेले निर्णय, अपकीर्ती, नुकसान, आपल्यातील मानसिक बिघाड याची जबाबदारी या व्यक्ती कधीही स्वतःवर घेत नाहीत. त्यांच्या या सर्व विषारी, मानसिक, भावनिक गोंधळातून अशा व्यक्ती कोणाला ना कोणाला सतत दोष देत राहतात, कोणावर तरी खापर फोडत राहतात, राग काढत राहतात, इतरांना टेन्शन देऊन, डिस्टर्ब करून इतरांची मनस्थिती बिघडवून, इतरांना डॉमिनेट करून ते इतरांचे आयुष्य खराब करण्यासाठी सतत प्रयत्न करतात. कुठेतरी लोकांनी त्यांची दखल घ्यावी, त्यांचे ऐकावे, त्यांची मतं विचारात घ्यावी असं त्यांना वाटतं, पण हे मिळवण्यासाठी ते जे जे काही स्वतःच्या वागण्या-बोलण्यातून करतात त्यामुळे उलट लोकं त्यांच्यापासून लांब जातात.
meenonline@gmail.com
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…