Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडी‘नमुंमपा’मध्ये बायोमेट्रिक हजेरीचे तीनतेरा!

‘नमुंमपा’मध्ये बायोमेट्रिक हजेरीचे तीनतेरा!

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

नवी मुंबई : महापालिकेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांना कार्यालयीन वेळ आणि शिस्त पालनाचे निर्देश नुकतेच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले होते. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर काही दिवसांनी ‘सजग नागरिक मंच-नवी मुंबई’च्या सभासदांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी कर्मचारी-अधिकारी यांच्या बायोमेट्रीक हजेरी नियम पालनाबाबतची पडताळणी केली. यावेळी महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप ‘सजग नागरिक मंच’द्वारे करण्यात आला आहे.

‘सजग नागरिक मंच’च्या वतीने १२ जुलै २०२४, २ ऑगस्ट आणि ५ ऑगस्ट २०२४ रोजी महापालिका मुख्यालयाच्या सर्व विभागात पाहणी करण्यात आली. वेळ, स्थळ दर्शवणाऱ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून फोटो काढण्यात आले. सकाळी १०.१५ पर्यंत बहुतांश कार्यालये ओस पडलेली दिसून आली. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा सुविधानुसार कार्यालयाची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ असली तरी बहुतांश कर्मचारी सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत कार्यालयात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. अगदी उपायुक्त दर्जाचे अधिकारी देखील १०.३० ते ११ च्या दरम्यान कार्यालयात येतात. तर अनेक कार्यकारी अभियंता ११ वाजल्यानंतर कार्यालयात येत असल्याचे’सजग नागरिक मंच’चे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, तर आयुक्तांच्या महापालिकेतील उपस्थितीबाबत देखील ‘सजग नागरिक मंच’ने नोंद घेत, त्यांच्या वेळेबाबत आक्षेप घेतला आहे.

महापालिका प्रशासनाचा धाक नसल्यानेच महापालिकेच्या शहर अभियंता, परवाना, शिक्षण आणि विधी विभाग आदि सर्वच ठिकाणी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशा प्रकारचा बेशिस्त कारभार चालू असल्याचे सुस्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप ‘सजग नागरिक मंच’ने केला आहे. मुख्यालयात जिथे आयुक्त बसतात, जिथे प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी बसतात, त्या ठिकाणी अगदी उघडपणे कार्यालयीन वेळ शिस्त पालनाचे तीनतेरा वाजत असतील, तर महापालिकेच्या वॉर्ड स्तरावरील कार्यालयात काय परिस्थिती असू शकेल, याचा विचार देखील केला जाऊ शकत नाही, असे ‘सजग नागरिक मंच’चे सुधीर दाणी यांनी सांगितले.

एकीकडे कुठल्याही प्रकारची जाण्या-येण्याची सुविधा नसताना, सफाई कामगारांना सकाळी ६ वाजता हजर राहणे बंधनकारक आहे. त्यांना बायोमेट्रिक हजेरी नोंदवणे अनिवार्य असताना घरापासून वाहनांची सुविधा असणाऱ्या अधिकारी वर्गाला बायोमेट्रिकचे वावडे का? महापालिका अधिकारी आम्हाला बायोमेट्रिक हजेरी सक्तीची नाही असे कसे सांगू शकतात? असा प्रश्न ‘मंच’चे सदस्य भीमराव जामखंडीकर यांनी उपस्थित केला.

महापालिका प्रशासनाने आपल्या सर्व कर्मचारी-अधिकारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीचा तपशील पब्लिक डोमेनवर खुला करावा. जेणेकरून करदात्या नागरिकांना आपण कर भरत असलेल्या महापालिकेतील कर्मचारा-अधिकारी कार्यालयात वेळेत येतात का ? वेळेत जातात का? याची माहिती मिळू शकेल. नागरिकांचा तो मूलभूत अधिकार असल्याचे ‘सजग नागरिक मंच’चे म्हणणे आहे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -