काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) पंधरा दिवसांच्या आत विमान कोसळल्याची ही दुसरी घटना असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नेपाळची राजधानी काठमांडू (Kathmandu) येथे काही दिवसांपूर्वी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून घसरल्याने मोठा अपघात घडला होता. यामध्ये १८ जणांचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असताना आता आणखी अशीच घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळून (Nepal Helicopter Crash) पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु असून येथील खराब व्यवस्थापनामुळे सातत्याने अपघात होत असल्याचा आरोप केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील नुवाकोटमधील शिवपुरी भागात एअर डायनेस्टीचे हेलिकॉप्टर कोसळले. आज दुपारी १ वाजून ५४ मिनिटाच्या सुमारास हे हेलिकॉप्टर काठमांडूहून स्याफ्रुबेन्सी येथे जात होते. मात्र काही अडचणींमुळे हे हेलिकॉप्टर रस्त्यातच क्रॅश होऊन त्याचा भीषण अपघात झाला. या अपघातात पायलटसह चार प्रवाशांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.