नागपूर : नागपूरमधून (Nagpur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरच्या इतवारी परिसरातील खापरपुरा येथील अत्तराच्या गोदामाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आली. मात्र यामध्ये एका तरुणीचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण बाखडे यांचे इतवारीतील खापरीपुरा परिसरात रेणुका नॉव्हेल्टी नावाचे दुकान आहे. त्याचठिकाणी ते कुटुंबासह राहतात. आज पहाटे संपूर्ण कुटुंब झोपलेले असताना तळमजल्यावरील गोदामात शॉटसर्किट झाला. गोदामात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने शॉटसर्किटने आगीचे रुप धारण केले. ही आग इतकीभीषण होती की काहीवेळातच आगीने संपूर्ण इमारतीला वेढले. आग पाहताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे अधिकारी आठ गाड्यांसह घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्यास सुरुवात केली. गोदामात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात आणि आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अथक प्रयत्न करुन दलाने अडकलेल्या चार जणांना बाहेर काढले.
जखमींची माहिती
या घटनेत प्रवीण बाखडे (४०), त्यांची पत्नी प्रीती बाखडे (३७), मुलगी अनुष्का बाखडे (१७) आणि मुलगा सार्थक बाखडे (१५) हे गंभीर जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान अनुष्काचा मृत्यू झाला तर बाखडे पती-पत्नीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.