Monday, February 10, 2025
Homeक्रीडाVinesh Phogat : १०० ग्रॅम वजनाने ‘सुवर्ण’ स्वप्नभंग! विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून...

Vinesh Phogat : १०० ग्रॅम वजनाने ‘सुवर्ण’ स्वप्नभंग! विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र

देशभरातून नाराजीचा सूर

पॅरिस (वृत्तसंस्था) : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. विनेशचे वजन जास्त भरल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विनेशचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, विनेश रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

विनेशने मंगळवारच्या लढतीसाठी वजन केले होते. नियमानुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. सर्व अडचणींना झुगारून अंतिम फेरीत पोहोचलेल्या या कुस्तीपटूचे वजन मंगळवारी रात्री अंदाजे २ किलो जास्त होते. ती रात्रभर झोपली नव्हती आणि निकष पूर्ण करण्यासाठी तिने जॉगिंगपासून स्किपिंग आणि सायकलिंगपर्यंत सर्वतोपरी प्रयत्न केले, पण ते अपुरे पडल्याने विनेशला आता अपात्र ठरवण्यात आले आहे.

कोणत्याही खेळाडूच्या वाट्याला असा दिवस येऊ नये, तो भारताच्या विनेश फोगाटच्या वाट्याला आला. मागील वर्षभर जंतरमंतरवरील आंदोलानमुळे प्रचंड टीकेचा सामना करावा लागणाऱ्या विनेशने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांना सडेतोड उत्तर दिले. ५० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये तिने प्रवेश करून इतिहास घडवला. ऑलिम्पिकमध्ये कुस्तीची फायनलमध्ये प्रवेश मिळवणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.

१७ ऑगस्ट २०२३ रोजी विनेशच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती आणि ८ दिवसांनी म्हणजेच २३ ऑगस्टला तिने पॅरिस ऑलिम्पिकसाठी लवकरच पुन्हा पायावर उभे राहण्याचे वचन दिले होते आणि ६ ऑगस्टला २०२४ मध्ये ती ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली. पण, बुधवारचा दिवस तिच्यासाठी एक वाईट बातमी घेऊन आला. केवळ १०० ग्रॅम वजन अधिक भरल्याने तिला अपात्र ठरवले गेले.

दरम्यान, विनेश, तिचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी कालची रात्र आव्हानात्मक होती. विनेशने वजन कमी करण्यासाठी काही खाल्ले नाही किंवा पाणीही प्यायली नाही. सर्व उपाय करून झाल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून विनेशचे केसही कापले गेले आणि रक्तही काढले गेले. पण तरीही अपयश आले.

विनेश फोगटच्या अपात्रतेच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आयडब्ल्यूएफ : पीटी उषा

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष पीटी उषा यांनी बुधवारी सांगितले की, भारतीय कुस्ती महासंघाने स्टार कुस्तीपटू विनेश फोगटला जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगशी संपर्क साधला आहे. महिलांच्या ५० किलो वजनी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी विनेशचे वजन जास्त आढळल्याने तिला बुधवारी ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले. उषा यांनी सांगितले की, विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी अपील दाखल केले आहे. उषा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘मी काही वेळापूर्वी विनेशला ऑलिम्पिक स्पोर्ट्स व्हिलेजच्या पॉली क्लिनिकमध्ये भेटले आणि तिला भारतीय ऑलिम्पिक संघटना, भारत सरकार आणि संपूर्ण देशाच्या पाठिंब्याचे आश्वासन दिले. आम्ही विनेशला सर्व वैद्यकीय आणि भावनिक आधार देत आहोत. भारतीय कुस्ती महासंघाने विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी (युनायटेड वर्ल्ड रेसलिंग) कडे अपील दाखल केले आहे.

‘आयओए ऑलिम्पिक संघाचे मनोबल उंचावत राहावे आणि सर्व भारतीय विनेश आणि ऑलिम्पिक दलाच्या पाठीशी उभे राहावेत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.’ आयओए प्रमुख म्हणाले की, विनेशचे वजन मर्यादेत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यांना चांगली जाणीव आहे. उषा म्हणाल्या, ‘डॉ. दिनशॉ पार्डीवाला आणि मिशन प्रमुख गगन नारंग यांच्या नेतृत्वाखालील विनेशच्या वैद्यकीय पथकाने रात्रभर घेतलेल्या परिश्रमाची आम्हाला चांगलीच जाणीव आहे जेणेकरून विनेश स्पर्धेच्या गरजा पूर्ण करू शकेल.

मंगळवारी तीन सामने लढल्यानंतर विनेशचे वजन सामान्यपेक्षा जास्त वाढले. डॉ.पार्डीवाला म्हणाले, ‘कधीकधी स्पर्धेनंतर वजनात वाढ झाल्याची घटना घडते. विनेशने तीन सामने लढले आणि निर्जलीकरण टाळण्यासाठी तिला थोडेसे पाणी दिले गेले. आम्हाला आढळले की, स्पर्धेनंतर त्याचे वजन सामान्यपेक्षा जास्त वाढले आणि प्रशिक्षकाने सामान्य वजन कमी करण्याची प्रक्रिया सुरू केली. – डॉ.पार्डीवाला

कुस्तीपटू विनेश फोगाटवर पॅरिसच्या रुग्णालयात उपचार

१०० ग्रॅम वजन कमी करतांना डिहायड्रेशनमुळे पडली बेशुद्ध; उपचारानंतर प्रकृती स्थीर

भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का बसला. कारण भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट ५० किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन १०० ग्रॅम जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय मिळवला होता. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र अंतिम सामन्याआधीच तिला अपात्र ठरवण्यात आले. अपात्र ठरल्यानंतर विनेश बेशुद्ध झाल्याचे समोर आले. डिहायड्रेशनमुळे विनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार विनेश ऑलिम्पक व्हिलेजच्या पॉलिक्लिनिकमध्ये आहे. तिची तब्येत आता स्थिर असल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान भारतीय पथकाकडे अपात्रतेविरोधात अपील करण्याचा कोणताही पर्याय नाही.पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत मंगळवारी भारताची कुस्तीपटू विनेश फोगटने महिल्यांच्या ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र, बुधवारी सकाळी तिला वजन १०० ग्रॅमने जास्त भरल्याने अपात्र ठरवण्यात आले. विनेश ही तीन ऑलिम्पिक खेळणारी पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तसेच महिलांच्या कुस्तीमध्ये ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठणारीही ती पहिलीच भारतीय ठरली होती.

कुस्तीच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळाडू हे विविध वजनी गटांमध्ये खेळतात. त्यामुळे जास्त वजनदार खेळाडूला कमी वजनाच्या खेळाडूशी खेळावे लागत नाही. कुस्ती, बॉक्सिंग, ज्युडो, तायक्वांदोसारख्या लढाऊ खेळांमध्ये स्पर्धकांना समान संधी मिळावी म्हणून वजनाचा हा नियम करण्यात आलेला आहे. कोणत्याही क्रीडा स्पर्धांमध्ये दोन दिवसाच्या काळात ठराविक वजनी गटाच्या स्पर्धा होतात. प्रत्येक खेळाडू हा एकाच वजनी गटात खेळू शकतो. स्पर्धकांना त्यांची नखं कापून कमी करावी लागतात. त्यानंतर खेळाडूंचे वजन केले जाते. तीस मिनिटांच्या या वैद्यकीय आणि वजन चाचणीनंतर खेळाडूंना त्या दिवशीचा सामना खेळता येतो.

विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर देशभरातून नाराजीचा सूर

पॅरिस ऑलिम्पिकच्या १२ व्या दिवसाची सुरुवात भारतासाठी दुःखद बातमीने झाली. ५० किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यानंतर विनेश डिहायड्रेशनमुळे बेशुद्ध झाली आणि आता तिला खेल गावच्या पॉलिक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. विनेश फोगाटला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नव्हे तर डिहायड्रेशनमुळे स्पोर्ट्स व्हिलेजमधील पॉलिक्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने बुधवारी एक निवेदन जारी करून विनेशला जास्त वजनामुळे खेळातून वगळल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि कुस्तीपटूच्या गोपनीयतेचा आदर करण्यास सांगितले. सुवर्णपदकापासून अवघे एक पाऊल दूर असताना भारताच्या विनेश फोगाटला जास्त वजन भरल्याचं कारण सांगत अपात्र ठरवण्यात आलं. देशभरातून त्यावर तक्रारीचा सूर निघताना दिसत आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेश फोगटच्या विलक्षण पराक्रमाने प्रत्येक भारतीयाला रोमांचित केले आणि देशाला अभिमान वाटला. तिच्या अपात्रतेबद्दल आम्ही सर्व तिची निराशा सामायिक करत असताना, ती १.४ अब्ज लोकांच्या हृदयात चॅम्पियन राहिली आहे. विनेश भारतीय महिलांच्या खऱ्या अर्थाने अविस्मरणीय भावनेला मूर्त रूप देते आणि तिची महाशक्ती आणि लवचिकता आधीच भारतातील भविष्यातील जागतिक विजेत्यांना प्रेरणा देत आहे. मी तिला भविष्यात अनेक गौरवांसाठी शुभेच्छा देतो. – राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू

विनेश, तू मोठी चॅम्पियन आहेस! विनेश तू भारताचा गौरव आहेस. शिवाय तू प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणास्त्रोत आहे. तुझे अपात्र ठरवले जाणे हे वेदनादायी आहे. आजचा भारताला बसलेला धक्का दु:खदायक आहे. मला झालेले दु:ख मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या निर्णयाने साऱ्यांनाच प्रचंड निराशा झाली आहे. पण, मला माहित आहे की तू फायटर आहेस. आव्हान स्वीकारणे हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला असून तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे. आम्ही सर्व तुझ्या पाठिशी आहोत. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

विनेश फोगट ऑलिम्पिकमधून बाहेर पडल्यामुळे कोट्यवधी भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. पण, एका विश्वविजेत्या पैलवानाचा पराभव करुन तिने तिची कारकीर्द चमकावली आहे. हा धक्का तिच्या कारकीर्दीतील एक अपवाद आहे, ज्यातून ती एका विजेत्याप्रमाणे पुनरागमन करेल, याची मला खात्री आहे. आमच्या शुभेच्छा आणि पाठींबा सदैव तिच्यासोबत असतील. – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

विनेशच्या विरोधात ब्रिजभूषण सिंह यांनी सर्वात मोठा कट रचला आहे. डोक्यावर असलेल्या केसांमुळेही १०० ग्रॅम वजन वाढू शकते. मात्र तिच्याविरोधात हा कट रचण्यात आला आहे. विनेशचे अपात्र ठरणे ही बातमी मनाला वेदना देणारी आहे. तिच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले. सपोर्ट स्टाफने तिला कुठलीही मदत केली नाही. मात्र तिच्या विरोधात कट रचला जातो आहे हे तिने मला सांगितले. ब्रिजभूषण सिंह यांनी विनेशच्या विरोधात सर्वात मोठा कट रचला आहे. ज्याची भीती होती ती गोष्ट घडली. मंगळवारी जी मॅच झाली त्यावेळी वजन का वाढले नाही? – राजपाल राठी, विनेश फोगटचे सासरे

कुस्तीपटू विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. भारतीय पथकासाठी ही अतिशय निराशाजनक आणि दुर्दैवी बातमी आहे. भारतीय चमूने रात्री तिच्या वजनासंदर्भात सर्वोत्तम प्रयत्न केले. मात्र सकाळी केलेल्या वजन चाचणीत तिचे वजन ५० किलोग्रॅमपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय पथक यासंदर्भात इतर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. – भारतीय ऑलिम्पिक समिती

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने या प्रकरणाचा तीव्र निषेध केला असून, पंतप्रधानांनी त्यांच्याशी बोलून आवश्यक कारवाई करण्यास सांगितले आहे. सरकारने विनेश फोगटला तिच्या आवश्यकतेनुसार शक्य ती सर्व मदत केली आहे, तिच्यासाठी वैयक्तिक कर्मचाऱ्यांसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. – मनसुख मांडविया, केंद्रीय क्रीडा मंत्री

सर्व देशवासीय विनेशच्या पाठीशी – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे कुस्तीपटू विनेश फोगटच्या घरी भेट देणार आहेत. हरियाणा आप पक्षाचे उपाध्यक्ष अनुराग धांडा म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह विनेश फोगटचे वडील महाबीर फोगट यांना भेटणार आहोत. या कठीण काळात सर्व देशवासीय देशाच्या मुलीच्या पाठीशी उभे आहेत. १०० कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाशी १०० ग्रॅमचे षडयंत्र मान्य नाही, असं ते म्हणाले.

भारताची सिंहिणी – भाजप खासदार कंगना रणौत

पॅरिस ऑलिम्पिक२०२४ मधून कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर कंगनाने तिला पाठिंबा दिला आहे. भाजप खासदार कंगना रणौतने विनेश फोगटच्या समर्थनार्थ इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मदर इंडिया विनेश फोगटच्या मागे उभी असलेली दिसत आहे. त्याचवेळी, चित्रावर लिहिले आहे – “रडू नकोस विनेश – संपूर्ण देश तुझ्या पाठीशी उभा आहे.” याशिवाय कंगनाने विनेशचा फोटोही शेअर केला असून तिला सिंहिणी म्हटले आहे.

आमच्यासाठी तूच विजेती – सुप्रिया सुळे

विनेश, तू मैदानाच्या आत आणि बाहेर खेळलेली प्रत्येक लढत प्रेरणादायी आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तुला महत्वाची लढाई तांत्रिक कारणामुळे खेळता येत नाही याचे आम्हा देशवासियांना दुःख आहे. समोर सुवर्णपदक दिसत असताना तुझ्यासोबत जे झाले त्याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. आता या क्षणी तुझी काय मानसिकता असेल हे आम्ही समजू शकतो. तू लढवय्यी आहेस, या निराशेच्या गर्तेतून बाहेर येशील हा विश्वास आहे. विनेश, फायनल कुणीही खेळू दे पण आमच्यासाठी तूच विजेती आहेस.

हा प्रकार खूप विचित्र – खासदार हेमा मालिनी

“हा प्रकार खूप विचित्र आहे. कोणी १०० ग्रॅम वजन वाढल्याने डिस्क्वालिफाय होत का? विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या फायनलमधून १०० ग्रॅम वजनामुळे डिस्क्वालीफाय झाली. यामधून असे दिसते की, आपले वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे आणि ते किती आवश्यक आहे”, असा सल्ला हेमा मालिनी यांनी दिला. वजनामुळे विनेश फोगाट डिस्क्वालिफाय झाल्याच्या घटनेतून आपण धडा घेतला पाहिजे.

अभिजीत केळकर, तेजस्विनी पंडीतची पोस्ट

अभिजीतने विनेशसाठी पोस्ट करत म्हटलं की,’तुझं अपात्र होणं हे आमच्या जिव्हारी लागंलय.’ त्याचप्रमाणे तेजस्विनीनेही विनेशचा फोटो शेअर करत, ‘आम्ही खरंच तुझ्या लायक आहोत का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. पुढे तिने म्हटलं की, ‘१०० ग्रॅमने १०० बिलियन्स हृदय तोडली आहेत. पण तरीही आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे. तु आमच्यासाठी चॅम्पियनच आहेस.’

प्रत्येक भारतीयांसाठी तू लखलखणारे सोने – प्रिती झिंटा

प्रितीनेही विनेशाचा फोटो पोस्ट करत म्हटलं की, प्रिय विनेश फोगाट, तुला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी तू लखलखणारं सोनं आहेस. तू विजेत्यांची विजेती आणि भारतातील प्रत्येक स्त्रीसाठी ‘हिरो’ आहेस. तुझ्याबाबतीत ज्याप्रकारे गोष्टी घडल्या, त्यासाठी वाईट वाटतंय. स्ट्राँग राहा आणि पुन्हा हिंमतीने उभी राहा. आयुष्य नेहमीच न्याय देते असं नाही…कठीण काळ टिकत नाही. पण, कठीण लोक टिकतात. मला आता तुला मिठी माराविशी वाटतेय आणि तुला सांगांवसं वाटतंय की आम्हाला तुझा गर्व आहे.

आलियाचे विनेशसाठी धीराचे शब्द

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने देखील विनेशसाठी धीराचे शब्द लिहिले आहेत. आलियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं की, ‘विनेश फोगाट तू संपूर्ण देशासाठी खूप मोठी प्रेरणा आहे.हा इतिहास रचण्यासाठी केलेला तुझा संघर्ष, तुझी जिद्द आणि तुझी कठोर मेहनत तुझ्यापासून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. पण तूच सोनं आहे आणि हे तुझ्याकडून कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्यासारखं कुणीच नाही.’

स्वरा भास्करने उपस्थित केला सवाल

अभिनेत्री स्वरा भास्कर हिने विनेशच्या निर्णयावर सवाल उपस्थित केला आहे. विनेश ही ५० किलो वजनी गटात कुस्ती खेळत होती. पण तिच्या अंतिम सामन्यावेळी जेव्हा तिचं वजन करण्यात आलं तेव्हा ते फक्त 100 ग्रॅम जास्त भरलं. त्यामुळे विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे यावर स्वरा भास्कर हिने सवाल उपस्थित केला आहे. तिने म्हटलं की, ‘या १०० ग्रॅम वजनाच्या गोष्टीवर कुणाचा विश्वास बसेल? ‘

विनेशचे वजन एका रात्रीत कसे वाढले हे फक्त प्रशिक्षक आणि पोषणतज्ञच सांगू शकतात’ – संजय सिंह, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष

“विनेश तू धैर्य आणि नैतिकतेची सुवर्णपदक विजेती आहेस. तु भारताची मुलगी आहेस आणि हे मेडलही देशाचेच आहे. ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी काल खेळण्यापूर्वी तुमचे वजन केले, तेव्हा ते अचूक होते. आज सकाळी जे घडले त्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाहीय. १०० ग्रॅम. तुमच्यासोबत असे घडले यावर विश्वास बसत नाही. संपूर्ण देशाला अश्रू आवरता येत नाहीत. सर्व देशांची ऑलिम्पिक पदके एका बाजूला आणि तुमचे पदक दुसऱ्या बाजूला” – बजरंग पुनिया

“हे देशाचे नुकसान आहे. महासंघ या प्रकरणात आवश्यक ते लक्ष देईल आणि याबाबत काय करता येईल ते पाहिल.
करण भूषण सिंह, खासदार,भाजपा

भारतीय कुस्तीपटूंविरुद्ध मोठे षडयंत्र- विजेंदर सिंग, बॉक्सर

“कुस्तीतील अनेक खेळाडूंना वजन कमी करुन खालच्या वजनी गटात खेळण्याची सवय असते. मात्र, कुस्तीसारख्या शरीराचा दम काढणाऱ्या खेळात तोंडावरही कंट्रोल असायला हवा. फक्त पाणी पिल्यानंतरही खेळाडूंचं वजन वाढतं. त्यामुळं तसंच काहीसं विनेश फोगटच्या बाबतीत झालं असावं – दीनानाथ सिंह, माजी हिंदकेसरी खेळाडू

“काल रात्री संपूर्ण भारतीय आनंदात होते. सगळ्यांना वाटलं होतं की आपण सुवर्णपदक जिंकणार आहोत. पण सकाळी आलेल्या बातमीनं खूपच निराशा झाली. तिला अपात्र करण्यात आलं आहे. यामुळं आपण तिन्ही पदकांमधून बाहेर पडलो आहे.” ” नियमाबाबत बोलायचे झाले तर एका गटात जर ५० किलो वजनाचे असतील तर त्या गटातील कुस्ती पहिल्या दिवशी समाप्त करायची असते. त्याच दिवशी सुवर्णपदकासाठी कुस्ती लढायला पाहिजे होती. पण कुस्ती का लढविण्यात आली नाही, याबाबत माहीत नाही. ती वजनामुळं अपात्र झाली आहे. यामुळं यात कोणीही अन्याय केला, असा भाग नाही. – कुस्ती प्रशिक्षक काका पवार, कुस्ती प्रशिक्षक

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -