
कोलंबो: तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने भारतावर जबरदस्त विजय मिळवला आहे. या सामन्यात श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारताने केवळ १३८ धावा केल्या.
या विजयासह श्रीलंकेने ही मालिका २-०अशी जिंकली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारत आघाडी घेतली. हा सामना खरंतर भारतासाठी करो वा मरोचा होता. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांनी लोटांगण घातले आणि तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला.
श्रीलंकेने विजयासाठी दिलेले २४८ धावांचे माफक आव्हानही भारताला पूर्ण करता आले नाही. श्रीलंकेच्या दुनिथ वेलालगेने ५ विकेट घेत भारताच्या डावाला खिंडार पाडली. तर महीश तिक्षणा आणि जेफ्री वांडरसे यांनी प्रत्येकी २ विकेट घेत श्रीलंकेच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या सामन्यात रोहित शर्माने ३५ धावा, वॉशिंग्टन सुंदरने ३० धावा आणि विराट कोहलीने २० धावा केल्या. बाकी फलंदाजांना चांगली धावसंख्या गाठता आली नाही.
भारताचे अधिकतर फलंदाज श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत फ्लॉप ठरले. रोहित शर्माने चांगली सुरूवात देण्याचा प्रयत्न केला. त्याने २० बॉलमध्ये ३५ धावा केल्या. शुभमन गिल ६ धावा करून बाद झाला. विराट कोहली २० धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १८ बॉलचा सामना केला. ऋषभ पंत ६ धावा करून बाद झाला. श्रेयस अय्यर ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अक्षऱ पटेल आणि रियान पराग १५ धावा करून बाद झाला.