तुम्ही मित्र बदलू शकता पण शेजारी नाही, इतिहास बदलू शकता पण भूगोल नाही’, असे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी पाकिस्तानात जाऊन १९९९ मध्ये एक ऐतिहासिक वाक्य उच्चारले होते. भारताच्या ‘नेबरहूड पॉलिसी’बद्दल भूमिका मांडताना त्यांनी उच्चारलेले हे वाक्य कुणीही आणि कधीही विसरू नये एवढे महत्त्वाचे आहे. ‘शेजारधर्म’ या शब्दात शेजार आणि धर्म असे दोन शब्द आहेत. शेजारी आपण बदलू शकत नाही, हे त्यावेळी वाजपेयी यांना वाटल्यामुळे, धर्म पाळण्याचे दायित्व त्यांनी अधोरेखित केले. भारत आशिया खंडाच्या दक्षिण भागात स्थित देश आहे. क्षेत्रफळानुसार भारत जगातील सातव्या क्रमांकाचा आणि लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. भारताची सीमा अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन, भूतान, नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंका या सात देशांशी संलग्न आहे. त्यातील आपला शेजारी देश असलेल्या बांगलादेशात सध्या हिंसाचार अन् जाळपोळीचा आगडोंब उसळला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देत देश सोडला आहे. सैन्याने देशाचा कारभार हाती घेतला असला तरी देखील हिंसाचार थांबलेला नाही. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाची कार्यालये, नेत्यांची घरे आणि हॉटेल्सना आगी लावल्या जात आहेत. इतकेच नाही तर उन्मादी जमावाने शेख हसीना यांच्या घरात घुसून लुटालूट केली आहे. या भयावह परिस्थितीमुळे येथे व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्याही संकटात सापडल्या आहेत. या कंपन्यांच्या व्यापारावर त्यांचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बांगलादेशात आजमितीस डाबरपासून ट्रेंटपर्यंत अनेक भारतीय कंपन्या काम करत आहेत. त्याचप्रमाणे, बांगलादेशमध्ये १९ हजार भारतीय असून त्यापैकी ९ हजार विद्यार्थी आहेत. भारतीय सीमा रक्षकांना बांगलादेशच्या परिस्थितीबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे तसेच बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू कुटुंबीयांवर हल्ले सुरू आहेत ही चिंताजनक बाब आहे. दुसऱ्या बाजूला देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शेख हसीना यांनी फक्त पंतप्रधानपदाचा राजीनामाच दिलेला नाही, तर आपल्या बहिणीसह देशदेखील सोडला आहे.
तब्बल २० वर्षांपेक्षा अधिक काळ सत्तेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला आहे. बांगलादेश या देशाची निर्मितीच मुळात भारताने केली. त्याविषयीच्या राजकारण आणि युद्धाच्या कहाण्या अनेक ठिकाणी, अनेक कार्यक्रमांतून प्रसारित झाल्या आहेत. या देशाच्या निर्मितीनंतर काही महिन्यांतच हसीना यांचे वडील मुजिब उर रहमान यांची हत्या झाली आणि त्यानिमित्ताने तिथल्या भारतविरोधी गटाने तोंड वर काढल्याची चिन्हे समोर आली होती. आज तिथला धार्मिक मूलतत्त्ववादही वाढीला लागला आहे. मुळात भारत आणि बांगलादेशमध्ये गेल्या ५३ वर्षांपासून द्विपक्षीय संबंध आहेत. त्यात सलग १५ वर्षांपासून बांगलादेशात शेख हसीना यांच्या नेतृत्वाखाली अवामी लीगचे सरकार होते. मागील वर्षी नवी दिल्लीत जी-२० शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भारताने बांगलादेशला विशेष पाहुणा म्हणून आमंत्रण दिले होते. हसीना यांची सत्ता संपुष्टात आल्याने भारतासमोर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. शेख हसीना यांच्या सत्ताकाळात त्यांनी भारतासोबत चांगले संबंध राहतील याचा प्रयत्न केला असला तरी, स्वत:च्या देशातील आरक्षणाच्या आंदोलनानंतर बिघडलेल्या परिस्थितीचा त्यांना अंदाज आला नाही, असेच म्हणावे लागेल.
बांगलादेशातले सत्ताकारण हे शेख हसीना वाजेद आणि खालिदा झिया या दोन महिलांभोवती गेले अनेक वर्षं फिरत आहे. बांगलादेशात नवे सरकार स्थापन होईपर्यंत, लष्कराचा ताबा असला तरी, खालिदा आणि अन्य विरोधी गटाचा वाढता प्रभाव हा भारताला भविष्यात डोकेदुखी ठरू शकतो. त्याचे कारण बांगलादेशातील या हिंसाचाराच्या हालचालीवर चीन लक्ष ठेवून आहे. भारतातील कापड केंद्र तिरुपूरला कापड मागणीत दहा टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. अमेरिका, युरोपातील प्रमुख ब्रँडचा कल भारताकडे वाढू शकतो. या परिस्थितीचा फायदा भारताला होऊ शकतो. असे असले तरी आज ज्या भारतीय कंपन्या बांगलादेशात काम करत आहेत, त्यांना मात्र या संकटाचा फटका बसण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. बांगलादेशातील संकट पाहता आशिया खंडातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने बांगलादेशातील कार्यालये ७ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशात ज्या भारतीय कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे, त्यात मॅरिको, इमामी, डाबर, एशियन पेन्टस्, पीडिलाइट, गोदरेज, सन फार्मा, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. अराजकतेचं संकट वाढत चालल्याने या कंपन्यांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही पद्धतींनी दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आंदोलनाने बांगलादेशला अशा वळणावर आणून ठेवले आहे की, देशाच्या भवितव्यावर अनिश्चिततेचे काळे ढग कधी दूर होतील हे आता सांगता येत नाही.त्यामुळे त्याची झळ भारतालाही बसत असली तर शेजार धर्म म्हणून बांगलादेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताला पुढाकार घ्यावा लागणार आहे.