Thursday, March 20, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेBridled Tern : खोल समुद्रातील ‘ब्रायडल्ड टर्न’ समुद्र पक्ष्याचे ऐरोली खाडीत दर्शन!

Bridled Tern : खोल समुद्रातील ‘ब्रायडल्ड टर्न’ समुद्र पक्ष्याचे ऐरोली खाडीत दर्शन!

समुद्रातील वादळी वाऱ्याने समुद्र पक्ष्यांचा किनारपट्टीच्या भागात संचार

प्रशांत सिनकर

ठाणे : बदलत्या वातावरणाचा त्रास माणसांबरोबर पशुपक्ष्यांना होत असून, त्याचे पडसाद आता समुद्र पक्ष्यांना सोसावे लागत आहेत. खोल समुद्रात वावरणारे पक्षी आता भरकटत ठाणे खाडी परिसरात दिसून येऊ लागले आहेत. अरबी समुद्राच्या मध्य भागात वावरणारा ब्रायडल्ड टर्न हा पक्षी ऐरोली खाडी भागात विहार करताना दिसून आल्याने पक्षी अभ्यासकांचे डोळे चक्रावले आहेत.

राज्यात पावसाच्या मुसळधार सरी बरसत असताना, दुसरीकडे मुंबई-ठाणे परिसरात सोसाट्याच्या वाऱ्याने सर्वच हवालदिल झाले आहेत. अरबी समुद्रात लाटांचा वेग देखील वाढल्याचे दिसून येते. मात्र याचा विपरीत परिणाम पक्ष्यांवर झाला आहे. समुद्र किनाऱ्यापासून कित्येक किलोमीटर आतमध्ये भिरभिरणारे पक्षी वादळी वाऱ्याने किनारपट्टीवर फेकले जात आहेत.

वाऱ्याच्या प्रचंड वेगाने त्यांचा अधिवास सोडून दुसरीकडे जावे लागत आहे. असाच ब्रायडल्ड टर्न हा पक्षी ऐरोली येथील खाडीत उडताना दिसून आला असल्याची माहिती पक्षी अभ्यासक शाहिद बामणे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून समुद्रात ताशी ४० ते ५० किमीने वारे वाहत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार समुद्र देखील खवळलेला बघायला मिळाला. मात्र अशातच समुद्रात दिसणारे पक्षी भरकटून मुंबई ठाणे किनारपट्टीवर दिसून आले आहे. ब्रायडल्ड टर्न पक्ष्याला मराठीत ‘लगाम सुरय’ या नावाने ओळखले जाते. पक्षी साधारण एक फूट लांबीचा असून, हा खोल समुद्रात दिसणारा पक्षी छोटे अथवा मेलेल्या माश्यांवर ताव मरतो. विणीच्या हंगामात समुद्रातील निर्जन बेटावर पिल्लांचे संगोपन करतो, असे पक्षीतज्ज्ञ अविनाश भगत यांनी सांगितले.

तसेच वादळी वाऱ्याने माणसाच्या सहवासापासून खूप दूरवर असणारे पक्षी मुंबई-ठाणे रायगड व पालघर सागरी खाडी किनाऱ्यावर दिसून येत आहेत. Bridled Tern (लगाम सुरय), Lesser Noddy (छोटा डोलमान्या) यासारखे सात आठ प्रकारचे दुर्मीळ समुद्र पक्षी दिसून येत आहेत. बोटीतून प्रवास करताना हे पक्षी समुद्रात विहार करताना दिसतात, असे ठाण्यातील पक्षी अभ्यासक, प्रतीक कुलकर्णी यांनी म्हटले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -