मुंबई : बेस्ट (Best Bus) उपक्रमामध्ये खासगी कंत्राटदारांच्या बसची संख्या वाढत असून, स्वमालकीच्या बसची संख्या आता कमी होत आहे. बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाच्या ताफ्यात स्वमालकीच्या बसगाड्यांची संख्या दिवसागणिक कमी होत असून सदर ताफ्यात स्वमालकीच्या नवीन बस समाविष्ट करण्याची नितांत गरज आहे. बेस्टचा ताफा बंद झाला, तर मुंबईकरांना स्वस्तात आणि वेगवान सेवेपासून मुकावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बेस्टचा स्वमालकीचा बसगाड्यांचा ताफा कायम राखण्यासाठी, मुंबईकरांना एकत्र करून ‘बेस्ट बचाव’ अभियान राबविण्यात येत असून, या अभियानामध्ये शहरातील ३६ आमदारांनाही सहभागी करण्याचा मानस बेस्टमार्फत केला जाणार आहे.
बेस्ट उपक्रमात खासगी कंत्राटदारांच्या बसची संख्या वाढत असून, स्वमालकीच्या बसची संख्या कमी होत आहे. मुंबई महानगरपालिकेने नवीन बसगाड्या खरेदी करण्यासाठी बेस्ट उपक्रमाला तातडीने निधी दिला नाही, तर मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी बेस्टची सार्वजनिक परिवहन सेवा डिसेंबर २०२५ नंतर बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे. खासगी कंत्राटदारांकडून अचानकपणे बसची सेवा बंद करण्याचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यामुळे भविष्यात खासगी कंत्राटदारांना नफा मिळत नसल्याने, थेट बस सेवा रद्द करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात.
त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे प्रचंड हाल होतील. भविष्यात मुंबईकरांसाठी बेस्टची सेवा निरंतर राहण्यासाठी, मुंबईकरांनी रस्त्यावर उतरले पाहिजे. तसेच मुंबई महानगरपालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी द्यावा, यासाठी मुंबईतील सर्व आमदारांनी प्रयत्न करावे.