पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात (Pune News) झिका व्हायरसचे (Zika Virus) थैमान अधिक वाढताना दिसून येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून (Health Department) शहरात सतर्कता घेतली असूनही झिकाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत पुण्यात झिकाचे ६६ रुग्ण आढळले असून यामध्ये २६ गर्भवती महिलांचा समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांसह आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका वाढल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत झिकाचा संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती या चार रुग्णांच्या मृत्यूंचे परीक्षण करणार आहे. तसेच बावधान येथील १९ वर्षीय गर्भवतीमध्ये झिका विषाणूचा संसर्ग आढळून आला आहे. त्याचबरोबर मागील तीन दिवसांत पुणे शहरात झिका विषाणूचा प्रादुर्भाव झालेली आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये सहा गर्भवती महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, यातील दोन गर्भवती महिलांचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठवले आहेत. मात्र गर्भवती महिलांना झिकाचा अधिक धोका असल्यामुळे महिलांनी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
गर्भवतींसाठी विशेष सूचना
झिका हा डेंग्यू आणि चिकुनगुनियासारखा एडिस डासांमुळे पसरणारा आजार आहे. हा आजार प्राणघातक नसला तरी झिकाची लागण झालेल्या गर्भवती महिलांना त्याचा अधिक धोका असतो. त्यामुळे नवजात अर्भकाच्या मेंदूचा आकार लहान होऊ शकतो. यामुळे गर्भवती महिलांचे झिका विषाणू संसर्गाच्या दृष्टीने तपासणी करून सतत दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
झिका व्हायरसची चिन्हे आणि लक्षणे
झिका व्हायरसची लक्षणे डेंग्यूसारखी आहेत. डास चावल्यानंतर ३ ते १४ दिवसांनी लक्षणे दिसतात. यामध्ये कमी दर्जाचा ताप, त्वचेवर पुरळ, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह (लाल डोळा), पोटदुखी अशा गोष्टींचा समावेश असू शकतो.
काळजी कशी घ्यावी?
- रुग्णाने पुरेशी विश्रांती घ्यावी.
- निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करावे.
- तापाकरिता पॅरासिटामॉल घ्यावे.
- ऑस्पिरीन अथवा एन.एस.ए.आय.डी. प्रकारातील औषधांचा वापर करू नये.