Friday, March 28, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यतिसऱ्या आघाडीची अजूनही 'कसरत'

तिसऱ्या आघाडीची अजूनही ‘कसरत’

मराठवाडा वार्तापत्र – अभयकुमार दांडगे

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपाला एकही जागा मिळू शकली नाही. त्यामुळे मराठवाड्याच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे पाय जमवू पाहणाऱ्या तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी आता पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. मराठवाड्याच्याच माध्यमातून पुन्हा विधानसभेत जागा मिळविण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. यासाठी महाराष्ट्रात विधानसभेसाठी तिसरी आघाडी स्थापन करून त्यांना ‘रसद’ पुरवठा केला जात आहे. थेट समोर न येता राज्यातील काही नाराज नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे.

सर्व प्रस्थापित नेते असलेल्या महाविकास आघाडी आणि महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत लढत देण्यासाठी सामाजिक संघटना, छोटे पक्ष, चळवळीत काम करणारे पदाधिकारी यांना एकत्र करण्याचा प्रयत्न मराठवाड्यात काही नेत्यांकडून सुरू आहे. या माध्यमातूनच तिसऱ्या आघाडीचा निवडणुकीत पर्याय देण्यात येईल, असे मत शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी नुकतेच व्यक्त केले. नांदेड दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. महाविकास आघाडी व महायुती या दोन्हींत प्रस्थापित नेत्यांचा भरणा आहे. हे नेते ४ वर्षे ९ महिने गायव राहतात, या काळात जनता वाऱ्यावर असते. यानंतर ते पांढरे ढगारे अंगावर चढवून बाहेर पडतात. आम्हीच तुमचे तारणहार आहोत, असे दाखवत असतात. जनतेच्या प्रश्नांचे त्यांना काही देणे-घेणे नाही. सत्ता आली की, गैरव्यवहार करणे, सत्तेसाठी इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जात असतात, असा आरोपही माजी खासदार शेट्टी यांनी यावेळी केला. महाराष्ट्रातील अलीकडच्या दोन वर्षांतील राजकारणातील उलथापालथीला जनता कंटाळली आहे, असे तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडून मराठवाड्यात बोलले जात आहे.

तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री केसीआर यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत सक्षम पर्याय देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. याकरिता चळवळीत काम करणाऱ्या राज्यातील काही नेत्यांशी त्यांचे गुप्त बोलणे झाले आहे. हैदराबाद येथे गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या बैठकाही पार पडल्या. वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी मी बोललो आहे. माजी आ. वामनराव चटप, शंकर अण्णा धोंगडे यांचेही बोलणे झाले आहे, असे शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले. समाजात गरीब घटकांसाठी आणि जनतेच्या प्रश्नावर सतत संघर्ष करीत असतात तेच समाजाचे खरे नेते असतात. यामुळे चळवळीत लढणारे, संघर्ष करणारे पदाधिकारी, संस्था, संघटना व छोटे पक्ष यांच्याशी तिसऱ्या आघाडी संदर्भात चर्चा होत आहे. के. सी. आर यांच्याकडून महाविकास आणि महायुतीच्या विरोधात काम करणाऱ्या घटकांनाही सोबत घेतले जाणार आहे. तिसऱ्या आघाडीसाठी सध्या वोट बांधण्याचे काम सुरू आहे, तर राज्यात विधानसभेसाठी उमेदवार कसे देणार यावर तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांचे एकमत झाल्यानंतर ठरणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. जनतेशी चर्चा करूनच त्या, त्या मतदारसंघात स्थानिक उमेदवार दिला जाईल, असे सांगितले जात आहे. छत्रपती संभाजीनगर येथे माजी खा. इम्तियाज जलील यांची तसेच शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार शेट्टी यांची गुप्त बैठक झाली. त्यावेळी विविध प्रश्नांवर चर्चाही झाली. राज्यात विधानसभेसाठी थोडा वेळ आहे.

एकंदरीत तिसऱ्या आघाडीला रसद पुरवठा करण्याचे काम तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. सी. आर यांच्याकडून होत असल्याचे अलीकडच्या बैठकीवरून लक्षात येत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच होणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष तयारीला देखील लागला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाला मराठवाड्यात स्थान न मिळाल्यामुळे जनता भाजपावर नाराज आहे, हे लक्षात घेऊन तिसऱ्या आघाडीने मराठवाड्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. मराठवाड्यातील मतदार कोणत्या पक्षाला तसेच कोणत्या नेत्याला कौल देईल याचा काही नेम नाही. मराठवाड्यातील मतदान इकडून तिकडे व तिकडून इकडे फिरत असतात. जनतेसाठी काय चांगले आहे? काय केले तर मतदार आपल्याकडे आकर्षित होईल? या संकल्पनेतून आता विविध पक्ष व नेते मतदारांना आपले करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात तेलंगणाचे तत्कालीन मुख्यमंत्री केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्या माध्यमातून त्यांनी तेलंगणाची सीमा असलेल्या मराठवाडा व विदर्भात जाहीर सभा घेऊन शेतकऱ्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केले होते. महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच इतर पक्षांतील काही नाराज नेते केसीआर यांच्या गळाला लागले होते. मराठवाडा व विदर्भात सभा घेत असताना त्यांनी अमाप पैसा खर्च केला होता. त्यावेळी त्यांच्या पैशाला पाहून मराठवाडा व विदर्भातील अनेक राजकारणी त्यांच्या पक्षात गेले होते. जिकडे पैसा तिकडे ‘नेते’ हे रिकामटेकड्या लोकांच्या बाबतीत ठरलेले गणित आहे.

अशा लोकांना एकत्र घेऊन केसीआर यांनी पडीत माजी आमदार व पडीत माजी खासदारांना स्वतःच्या पक्षात ओढले होते. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या पक्षात गेलेल्या मराठवाड्यातील काही नेत्यांनी मागील महिन्यात के. सी. आर यांच्याकडे जाऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या आघाडीला उभे करण्यासाठी पुढाकार घेण्याचा आग्रह धरला. त्यानंतर केसीआर यांनी देखील महाराष्ट्रातील काही शेतकरी नेत्यांची हैदराबाद येथे गुप्त बैठक घेतली. सध्याच्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना एक चांगला पर्याय देण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राची जनता भाजपा तसेच अजित पवार गट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कंटाळली असल्याचे सांगून मतदार या तिन्ही नेत्यांना सोडून नवीन नेत्यांना सत्तेवर बसवेल असा आशावाद व्यक्त केला. आपण पैशाने कमी पडत आहोत, असे त्यामध्ये चर्चिले गेल्याने केसीआर यांनी या निवडणुकीसाठी पैसा लावण्याची तयारी दर्शविली. त्या दृष्टीने त्यांनी ‘तुम्ही कामाला लागा’ असा आदेश दिला असल्याचे राजकीय गोटातून सांगितले जात आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -