संतप्त गावक-याने सांडपाणी टाकले ग्रामपंचायत कार्यालयात
मोनिश गायकवाड
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पूर्णा ग्रामपंचायतीचे प्रशासन व सरपंच गावातील अपूर्ण असलेले ड्रेनेज गटाराचे बांधकाम करीत नसल्याने पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर व अनेकांच्या घरात शिरत आहे. या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी मागील वर्षभर पाठपुरावा करूनही प्रशासन व सरपंच या प्रश्नांकडे लक्ष देत नसल्याने त्रस्त झालेले तक्रारदार स्वप्निल वाफेकर यांनी ड्रेनेज व गटारीचे सांडपाणी पूर्णा ग्रामपंचायत कार्यालयात फेकून सरपंच वैशाली पाटील व प्रशासनाचा निषेध केला.
अनेकदा तक्रारी अर्ज करून सुद्धा आपली मागणी पूर्ण करीत नसल्याने ड्रेनेजच्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधीमुळे सर्व ग्रामस्थ त्रस्त असून ड्रेनेज गटार बांधकाम येत्या दहा दिवसात सुरू न केल्यास ग्रामपंचायत व सरपंच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराचे बॅनर गावातील नाक्यावर लावणार असल्याचा इशारा स्वप्निल वाफेकर यांनी दिला आहे.
विशेष म्हणजे हे आंदोलन सुरू असताना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसेवक व उपसरपंच सदस्य उपस्थित होते. परंतु त्यांनी स्वप्नील वाफेकर यांना थांबवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.