पूर्वांचल छात्रावास, नाशिक

  52

सेवाव्रती - शिबानी जोशी


ईशान्यकडच्या सात राज्यांना निसर्गाचं भरभरून वरदान मिळालं आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला हा प्रदेश उर्वरित देशाच्या खूपच टोकाला असल्यामुळे स्वातंत्र्यानंतर तिथे संपर्क करणे तसे कठीण जात असे. त्यातच या सात राज्यांमध्ये अनेक जाती, जनजाती, पहाडी संस्कृती तसेच तिथल्या लोकांच्या चेहऱ्याची वेगळी ठेवण अशा अनेक बाबींमुळे तिथली लोकं स्वतःला भारतीय समजतचं नसतं. उर्वरित भारतातील कोणी व्यक्ती तिथे गेला तर आर यू इंडियन? असे विचारले जात असे. त्यांच्यामध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण व्हावी तसेच विकासाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचावी यासाठी आता खूपच प्रयत्न होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र पन्नास वर्षांपूर्वीपासूनच इथल्या भागातल्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय समस्या पाहून त्या ठिकाणी  कार्य करायला सुरुवात केली होती. ईशान्येकडल्या राज्यातील नागरिक आणि उर्वरित भारतातील नागरिकांमध्ये देवाण-घेवाण व्हावी, त्यांना शिक्षण, आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करण्यात येत होते, त्यातलाच एक प्रयत्न होता तो म्हणजे तिथल्या मुलांना उर्वरित भारतातल्या विविध भागांत शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. महाराष्ट्रामध्ये या कार्यासाठी आठ वसतिगृह सध्या कार्यरत आहेत, त्यापैकीच पाचवी ते बारावीतील मुलींसाठी नाशिकमध्ये छात्रावास  आहे.


सुरुवातीच्या काळात भोसला मिलिटरी स्कूलमध्येच ईशान्येकडून आलेल्या मुलींची राहायची तसेच शिक्षणाची व्यवस्था केली जात असे. नाशिकच्या वसतिगृहाचे गिरीश वैशंपायन, लक्ष्मण जोशी आणि मंगला सौदीकर हे संस्थापक होते. त्यांच्या प्रयत्नातूनच या वसतिगृहाला सुरुवात झाली. त्यानंतर दानशूर व्यक्तींकडून मिळालेल्या जागेवर या मुलींसाठी निवासाची सोय करण्यात आली. खाणं-पिणं, शिक्षण, शिक्षणासाठी वह्या-पुस्तकं, ट्युशन यांचा खर्च अशी सर्व व्यवस्था केली जाते. सध्या रत्नाताई पेठे तसेच मदन जी भांदुरे यांचं मार्गदर्शन घेत प्रकल्प प्रमुख म्हणून राहुल काळकर काम करत आहेत आणि वेगवेगळ्या कामांसाठी शिल्पा अग्निहोत्री, वैशाली केळकर यांच्यासारख्या  कार्यकर्त्या त्यांना सहाय्य करत आहेत.


या मुलींना ईशान्येकडून सुरक्षितपणे आणल्यानंतर त्यांना भोसला मिलिटरी स्कूलच्या शाळेमध्ये अॅडमिशन दिली जाते. सध्याचे वसतिगृह तिथून एक किलोमीटर अंतरावरच असल्यामुळे या मुलींसाठी सायकलची व्यवस्थाही करून देण्यात आली आहे. यामुळे त्या सायकलने शाळेत जातात. त्यानंतर त्यांची बुद्धिमत्ता, आवड तसेच कुवतीप्रमाणे त्यांना ट्युशनही लावल्या जातात. समितीच्या शाखेमध्ये देखील या मुली जातात.  वसतिगृहामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा त्यांचा दिवस व्यवस्थित आखलेला  असतो. सकाळी उठल्यापासून योगासन, नाश्ता, अभ्यास त्यानंतर शाळेतून आल्यावर ट्युशन्स तसंच त्यांच्यामध्ये जर काही इतर आवड असेल, तर चित्रकला, क्रीडा अशा प्रकारांमध्येही त्यांना प्रशिक्षण दिले जाते. योगासनाचे वर्गही चालवले जातात. इथल्या मुलींपैकी काही जणांनी योगासनाचे प्रशिक्षण घेऊन त्या स्वतःही आता योगासन शिकवू लागल्या आहेत.


सध्या नाशिकच्या वसतिगृहामध्ये १५ मुली राहत आहेत तसेच आतापर्यंत  ६५ ते ७० मुली इथून शिकून पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला किंवा आपापल्या गावी गेल्या आहेत. यातील अनेक मुली उच्चशिक्षित झाल्या असून नाशिकच्या छात्रावासात राहून गेलेली डेलिना नावाची विद्यार्थिनी एलएल.बी., एलएलएम शिक्षण पूर्ण केल्यानंतर मेघालयात परतली. तिथे तिने स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली आणि त्याचबरोबर तिच्यासारख्या अनेक यशोगाथांवर आधारित पुस्तकाचे तिथल्या भाषेत रूपांतर करून ते प्रकाशित केले. तिचं हे काम पाहून प्रकाशन समारंभाला खुद्द सरसंघचालक मोहनजी भागवत उपस्थित होते. तिच्या ईशान्यकडच्या महिलांसाठीच्या कामाची, बुद्धिमत्तेची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आयोगाच्या समितीमध्ये सदस्य म्हणून तिची निवड केली आहे.


मुलींना सुरक्षित वातावरण देणे हे तितकेच महत्त्वाचे असते, त्यासाठी पूर्णवेळाची व्यावस्थापिका इथे कार्यरत आहे. मुलींसाठी विविध उपक्रम राबवले जातात तसंच आपले सर्व सण-उत्सव, राष्ट्रीय दिवसही साजरे केले जातात. अशा तऱ्हेने ईशान्यकडून आलेल्या मुलींसाठी सुरक्षित, संरक्षित वातावरणात राष्ट्रीय विचार, शिक्षण, प्रशिक्षण देऊन त्यांना देशाचे आदर्श नागरिक घडवण्याचे काम वसतिगृह करत आहे.


joshishibani@yahoo. com

Comments
Add Comment

हवामान बदलाशी सामना : भारताचा ११ वर्षांचा चढता आलेख

भूपेंद्र यादव मानवनिर्मित हवामान बदलाचे परिणाम सध्या संपूर्ण जगभर जाणवू लागले आहेत. आंतरसरकारी हवामान बदल

आक्रमक सत्ताधारी अन् दिशाहीन विरोधक

महाराष्ट्रनामा : सुनील जावडेकर आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या

नारीशक्तीची डिजिटल भरारी

सावित्री ठाकूर प्रगतीची नवी व्याख्या पूर्वी डिजिटल साक्षरता मोठ्या शहरांपर्यंतच मर्यादित होती, मात्र तिची

पप्पा सांगा कुणाचे?

स्वाती राजे कित्येक वर्षं या बातमीने काळजात घर केलं होतं. ही मुलगी पुढे काय करेल? कशी राहील? कशी जगली असेल?

शुभांशूची अभिमानास्पद भरारी

अजय तिवारी गेल्या दोन-तीन दशकांमध्ये भारताचा अंतराळ कार्यक्रम त्याच्या आर्थिक प्रगतीमुळे ठळकपणे दिसू लागला.

युद्ध सरले, विजय कोणाचा?

अजय तिवारी इस्रायलने १३ जूनच्या रात्री इराणवर अचानक हवाई हल्ला केला. त्यामुळे पश्चिम आशियात एक नवे युद्ध सुरू