काय आहे यामागील मुख्य कारण?
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ (Inflation) पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. मात्र, आता एक दिलासा देणारी बाब समोर आली आहे. सरकारच्या नव्या धोरणामुळे डाळींच्या किंमती कमी होताना दिसत आहेत. येत्या काही दिवसांत त्या आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
भाजीपाल्यासह डाळींचेही दर वाढत असल्याचं दिसत होतं. मात्र, सरकारच्या नवीन धोरणामुळे सध्या डाळीच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. जवळपास वर्षभराच्या त्रासानंतर गेल्या महिनाभरापासून आता डाळींचे भाव उतरु लागले आहेत. अहवालानुसार हरभरा, तूर आणि उडीद या डाळींच्या किंमती कमी झाल्या आहेत. डाळींचा किरकोळ महागाईचा दर जानेवारीमध्ये १९.५४ टक्के होता, तो जूनमध्ये १६.०७ टक्क्यांवर आला आहे. ही बाब सर्वसामान्यांना दिलासा देणारी आहे.
डाळींच्या किंमती किती घसरल्या?
ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, तुरीच्या डाळीच्या किरकोळ किमती १६० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्या आहेत. महिनाभरापूर्वीच्या तुलनेत ही घट ५.८ टक्के आहे. त्याचप्रमाणे मसूर डाळ महिनाभरापूर्वीच्या तुलनेत १० टक्के स्वस्त होऊन ९० रुपये किलोपर्यंत खाली आली आहे. प्रमुख बाजारात हरभरा, तूर आणि उडीद डाळीच्या किमती गेल्या एका महिन्यात ४ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. एका वर्षाहून अधिक काळ महागाई दर हा १० टक्क्यांच्या वर आहे. परंतु आता किमती नरमल्याने महागाईचा दरही कमी होईल, अशी सरकारला आशा आहे.
डाळींच्या दरात घसरण होण्याचं कारण काय?
सरकारच्या प्रयत्नांमुळे आयातीत झालेली वाढ हे किंमती कमी होण्याचं मुख्य कारण आहे. डाळींच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने तूर, उडीद आणि मसूर डाळ यांच्या शुल्कमुक्त आयातीला ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे डाळींची आयात वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताने ४.७३ दशलक्ष टन डाळींची आयात केली होती. जी २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ९० टक्के अधिक आहे.
तूर आणि हरभरा डाळीवर सरकारकडून ३० सप्टेंबरपर्यंत साठा मर्यादा घालण्यात आली आहे. यामुळे उपलब्धता सुधारण्यासही मदत होत आहे. दुसरीकडे चांगला पाऊस झाल्याने डाळींच्या पेरण्या वाढत आहेत. २ ऑगस्टपर्यंत ११.०६ दशलक्ष हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली होती. जी एका वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे ११ टक्के अधिक आहे. येत्या काही महिन्यात डाळींच्या किंमती आणखी कमी होण्याची अपेक्षा आहे.