Friday, March 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजBangladesh violence : बांगलादेशात खळबळ! सुमारे ५०० कैदी तुरुंगातून पसार

Bangladesh violence : बांगलादेशात खळबळ! सुमारे ५०० कैदी तुरुंगातून पसार

सत्तापालट झाल्याने देशाची व्यवस्था कोलमडली; हिंसक आंदोलकांनी लुटलं पंतप्रधानांचं शासकीय निवासस्थान

ढाका : बांगलादेशात सध्या मोठी खळबळ (Bangladesh violence) माजली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलक प्रचंड हिंसक झाले असून त्यांनी राजीनामा देऊन देश सोडून गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांचं शासकीय निवासस्थान लुटलं आहे. एवढंच नव्हे तर हल्लेखोर लाठ्या घेऊन थेट तुरुंगातही घुसले आणि त्यांनी कैद्यांना बाहेर काढलं. यामुळे सुमारे ५०० कैदी तुरुंगातून पसार झाले आहेत. यात दहशतवाद्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेशात सुरु असलेल्या आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळालं. त्यानंतर तब्बल १५ वर्षांपासून बांगलादेशची धुरा सांभाळणाऱ्या शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडून पलायन केलं आणि सत्ता लष्कराच्या हाती गेली. मात्र, आंदोलकांनी देशाची सूत्र लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे. हिंसक जमावाने तुरुंगात देखील घुसून जाळपोळ केली. यात सुमारे ५०० कैदी पळून गेले. अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे. आज भारत सरकारच्या वतीने संसदेत बांगलादेश हिंसाचारावर निवेदन देण्यात आलं.

आंदोलकांकडून जाळपोळ 

आंदोलकांनी शेरपूरच्या कारागृहातच नव्हे तर दमदमा कालीगंज परिसरातही घुसून आग लावली. शेरपूरचे उपायुक्त अब्दुल्ला अल खैरुन यांनी सांगितलं की, सायंकाळी पाचच्या सुमारास हल्लेखोरांनी कारागृहावर हल्ला केला. सोमवारी संतप्त जमावाने जेलसह पोलीस ठाण्यांनाही लक्ष्य केलं. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याला हल्लेखोरांनी आग लावली. याशिवाय जिल्हा परिषद, जिल्हा निवडणूक कार्यालय, सोनाली बँक तसेच अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली.

शेख हसीना सध्या कुठे आहेत?

शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत, देशाबाहेर पलायन केलं. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. भारतात काही दिवस आश्रय घेतल्यानंतर शेख हसीना इंग्लंडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

बांगलादेशमध्ये का उफाळला हिंसाचार?

बांगलादेशात जुलै महिन्यापासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं होतं. सरकारी नोकरीत सध्या असलेला आरक्षणाचा कोटा रद्द करावा, अशी या विद्यार्थ्यांची मागणी होती. या आंदोलनानंतर शेख हसीना सरकारने काही कोटा कमी केला, मात्र तरीही आक्रमक आंदोलकांनी शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

मागील अनेक दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणावरुन वादंग सुरु आहे. शासकीय नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या बांगलादेशमध्ये हे आंदोलन चालू आहे. १९७१ साली बांगलादेशची निर्मिती झाली. या लढ्यात ज्या लोकांनी आपले योगदान दिलेले आहे, त्यांच्या वंशजांना मिळत असलेले आरक्षण कायम राहावे, असे आंदोलकर्त्यांचे मत आहे. तर हे आरक्षण आता बंद करावे, असे दुसऱ्या एका गटाचे मत आहे.

बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रमात सामील झालेल्या लोकांच्या कुटुंबीयांना बांगलादेशमध्ये ३० टक्के आरक्षण मिळते. या देशात धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना ५ टक्के आरक्षण दिले जाते. एक टक्का आरक्षण दिव्यांगांना दिले जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -