नागपूर : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरमधील (Nagpur News) मौदा तालुक्यातील झुल्लर गावात वीट बनवणाऱ्या एका खासगी कंपनीमध्ये भीषण स्फोट (Company Blast) झाला आहे. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून ६ ते ७ कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. मात्र पहाटे झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौदा तालुक्यातील झुल्लर येथे श्रीजी ब्लॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काल रात्री कंपनीत विटा बनवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही कामगार रात्रीच्या वेळी कंपनीत हजर होते. दरम्यान, आज मंगळवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कंपनीत काम सुरु असताना अचानक बॉयलरचा स्फोट (Massive Explosion) झाल्याने हा अपघात घडला. हा स्फोट इतका भीषण होता की, जवळपासच्या परिसराला हादरे बसले. तसेच या घटनेत कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला असून इतर नऊ कामगार जखमी झाले आहेत.
दरम्यान, स्फोटाचा जोरदार आवाज झाल्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. सध्या जखमींवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच पोलिसांकडूनही घटनेचा अधिक तपास घेतला जात आहे.