महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही म्हणत राज ठाकरेंचा पवारांना खोचक टोला
आरक्षणाचा वाद शाळा-कॉलेजातल्या मुलांपर्यंत जाणं हे भीषण चित्र : राज ठाकरे
सोलापूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्या एका वक्तव्यावर भाष्य केले. शरद पवार यांनी यापूर्वी एकदा महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली होती. यावर राज ठाकरे यांनी मात्र ‘शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला हातभार लावू नये!’ असा खोचक टोला लगावला आहे. तसेच महाराष्ट्रात मराठा-ओबीसी आरक्षणाच्या (Maratha-OBC Reservation) वादामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली.
शरद पवार हे महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त करतात. याबाबत तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.
आरक्षणाचा वाद शाळा-कॉलेजातल्या मुलांपर्यंत जाणं हे भीषण चित्र
राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे कोणाच्या खांद्यावर बंदुका ठेवून सुरु आहे. या माध्यमातून मतं हातात घेणं सुरु आहे. यापलीकडे ओबीसी किंवा मराठा मुलामुलींच्या भवितव्याचा विचार कोणाकडूनही केला जात नाही. हे केवळ मतांचं राजकारण आहे. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत, या सगळ्यातून हाताला काहीही लागणार नाही. मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे. लहान लहान मुलं या आरक्षणाच्या वादामुळे आमची मैत्री तुटली असं सांगत होती, हे सगळं आता शाळा-कॉलेजपर्यंत गेलं आहे. हे चित्र भीषण आहे. असे वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हते. ज्या महाराष्ट्राने आजवर देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडला आहे, हे चित्र दुर्दैवी आहे. अशाप्रकारचं राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक समाजाने निवडणुकीवेळी दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
मतांसाठी माथी भडकावण्याचा उद्योग
महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. जितक्या नोकऱ्या इथे उपलब्ध होतात तितक्या दुसरीकडे होत नाहीत. केंद्र सरकार अनेक ठिकाणी खासगीकरण करत आहे. खासगी शिक्षणसंस्था आणि कंपन्यांमध्ये आरक्षण आहे का? मग किती नोकऱ्या उपलब्ध होणार? त्यामुळे आपण या सगळ्या बाबी नीट तपासल्या पाहिजेत. हा सगळा माथी भडकावून मतं मिळवण्याचा उद्योग आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला.
आपला सर्वाधिक पैसा हा बाहेरच्या लोकांवर खर्च होतो
राज ठाकरे म्हणाले की, आपला सर्वाधिक पैसा हा बाहेरच्या लोकांवर खर्च होतोय. ठाणे जिल्हा हा देशातील हा एकमेव जिल्हा जिथे ७-८ महापालिका आहेत. मग इथली लोकसंख्या ठाण्यातील लोकांनी वाढवली का? ही लोकसंख्या बाहेरच्या लोकांनी वाढवली. आपला पैसा त्यांची व्यवस्था करण्यातच जातो, आपल्या नोकऱ्यांच्या जाहिराती युपी बिहारमध्ये येतात, मग आपल्या तरुणांना हे कळत नाही.