पुतण्याला घोषित केलं राजकीय वारसदार
मुंबई : सध्या राज्यभरात आगामी विधानसभा निवडणुकांची (Vidhansabha Election) धामधूम सुरु आहे. सर्वच पक्ष यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश लक्षात घेता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसेनेही जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, त्यातच अजितदादांचे माजलगावचे (Majalgaon) आमदार प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे अजित पवार गटासाठी हा एक धक्का आहे. असं असलं तरी प्रकाश सोळंके यांनी त्यांचा राजकीय वारसदार जाहीर केला आहे.
अजित पवार गट विधानसभेसाठी जुळवाजुळव करत असतानाच प्रकाश सोळंके यांनी घेतलेल्या राजकीय निवृत्तीची चर्चा रंगली आहे. त्यांनी आगामी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. सध्या प्रकाश सोळंके हे २०२४ च्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गावांचे दौरे करत आहेत. त्याचवेळी एका गावात बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. याचसोबत त्यांनी राजकीय वारसदार म्हणून पुतण्या जयसिंह सोळंके (Jaisingh Solanke) यांच्या नावाची घोषणा केली आहे.
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.