किल्ले रायगड येथून निवडणुक प्रचाराचा शुभारंभ
महाड : यावर्षी श्रावण मासाची सुरुवात श्रावणी सोमवारने झाली असून सुमारे ७१ वर्षाने हा योग आला आहे. त्याचेच औचित्य साधून शिवसेनेचे उपनेते, पक्ष प्रतोद तथा महाड पोलादपूर माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसमवेत किल्ले रायगडावरील श्री जगदीश्वराला अभिषेक घालून महायुतीची पुन्हा महाराष्ट्रात सत्ता येऊन महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी साकडे घातले. याचवेळी त्यांनी महाड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ श्री जगदीश्वराचे मंदिरात श्रीफळ वाढवून केला.
महाराष्ट्रातील विधानसभाच्या निवडणुका आक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. श्रावण मासाची सुरुवात पहिल्या सोमवारने होण्या़चा योग ७१ वर्षाने आल्याचे औचित्य साधून गेल्या तीन टर्ममध्ये आपल्या निवडणुक प्रचाराचा शुभारंभ किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत श्रीफळ वाढवून करणाऱ्या आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या चौथ्या टर्मच्या आमदारकीच्या प्रचाराची सुरुवात किल्ले रायगडावरील श्री जगदीश्वराला अभिषेक घालून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत श्रीफळ वाढवून केली. याच वेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांसह सर्व मंत्रीमंडळाच्या वतीने श्री जगदीश्वराला साकडे घालून देशात व राज्यात येणाऱ्या काळात चांगला पाऊस पडू दे, महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येऊन जास्तीत जास्त उमेदवार निवडून येऊ दे, रायगडातील महायुतीचे सातही आमदार विजयी होऊ दे असे गाऱ्हाणे घातले.
यावेळी गोगावले यांचे समवेत आमदार अनिकेत तटकरे, युवा सेनेचे कोकण संघटक विकास गोगावले, राजिपच्या माजी सदस्या सुषमाताई गोगावले, चंद्रकांत कळंबे, मनोज काळीजकर, प्रमोद घोसाळकर, विजय सावंत, नितीन पावले, सपना मालुसरे, निलीमा घोसाळकर यांसह शिवसेना युवा सेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.