कल्याण/मुंबई : ठाकुर्ली स्थानकाच्या आधी कल्याण दिशेला सोमवारी दुपारी अडीच वाजणाच्या सुमारास ओव्हर हेड वायर तुटल्याने मध्य रेल्वे विस्कळीत झाली. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल रखडल्या होत्या. तर लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील यामुळे खोळंबल्याने रेल्वे प्रवाशांचे हाल झाले. लोकल थांबल्याने अनेक प्रवासी खाली उतरून ट्रकमधून चालत पुढे जाणे पसंद केले.
ठाकुर्ली स्थानकादरम्यान बदलापूरकडे जाणारी लोकलचा ओव्हर हेड वायरचा स्पार्क होऊन स्फोट झाला. त्यामुळे बदलापूर लोकलमधील प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी मदत करत बाहेर काढले. घटनास्थळी रेल्वे दुरूस्ती पथकाने पोहचत दुरूस्ती काम तातडीने सुरू केल्याने स्लो ट्रॅक वरील रेल्वे सेवा सुरू झाली. फास्टट्रॅक वरील रेल्वे सेवा त्यानंतर सुरू झाली.
दुरुस्ती करून प्रथम धीम्या मार्गावरील व नंतर जलद मार्गावरील सेवा संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्व सेवा सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले. सुमारे अडीच तासाच्या अथक प्रयत्नांनंतर रेल्वे सेवा सुरळीत सुरू झाली. या घटनेने सर्वच रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत होते. या सर्व गोंधळात १२ लोकल रद्द करण्यात आल्या अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
संध्याकाळी कार्यालय सुटण्याच्या वेळेत रेल्वे अर्ध्या तास उशिरा धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले . रात्री उशिरापर्यंत रेल्वे उशिराने धावत होत्या.