चालक-वाहकाऐवजी सोयीने मिळवली कार्यालयीन कामे
मुंबई : खोटे अपंगत्व प्रमाणपत्र दाखवत तसेच आईवडिलांचंही नाव बदलत आयएएस पद मिळवलेल्या पूजा खेडकर सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांचे अनेक कारनामे उघडकीस आल्याने यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली असून भविष्यातील कोणत्याही परीक्षा अथवा निवडींमधून त्यांना कायमचं काढून टाकलं आहे. हे प्रकरण ताजं असचतानाच आता बेस्टमधूनही असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेस्टमध्ये नोकरी मिळवताना खोटे अपंगत्व प्रमाणपत्र दाखवत ६० जणांनी चालक-वाहकाऐवजी सोयीने कार्यालयीन कामे मिळवल्याचा कारनामा उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोर्टाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांची चौकशी होत नसल्याचा आरोप केला जात आहे.
२०११ मध्ये एक व्यक्ती बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरीला लागला. २०१६ मध्ये लकवा झाल्याचे सांगत ही व्यक्ती वैद्यकीय रजेवर गेली. वैद्यकीय रजा संपविण्यापूर्वी शासकीय वैद्यकीय मंडळाकडून अपंगत्व प्रमाणपत्र मिळवून कार्यालयीन काम मिळण्यासाठी त्यांनी बेस्टमध्ये अर्ज सादर केला. त्यांच्या अर्जाची फाइल बेस्टच्या डॉक्टरांनी मंजूरही केली. मात्र एका डॉक्टरला त्यांच्या प्रमाणपत्रावर संशय आल्याने पुनर्तपासणी करण्यात आली. त्यात या कर्मचाऱ्याने आरटीओतून लायसन्स रिन्यू केल्याचे निदर्शनास आले. पण त्यासाठी या कर्मचाऱ्याने आरटीओमध्ये स्वयंघोषित फिटनेस प्रमाणपत्रे सादर केली असल्याचे समोर आले.
अशाप्रकारे या कर्मचाऱ्याच्या बनावट प्रमाणपत्राचे पितळ उघडे पडले. या कर्मचाऱ्याप्रमाणे बेस्टमधील अनेक कर्मचाऱ्यांनी अशाचप्रकारे बनावट अपंगत्व प्रमाणपत्राद्वारे सोयीचे कार्यालयीन काम मिळवल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणी बेस्ट प्रशासन मुंबई हायकोर्टात गेले असता कोर्टाने या प्रकरणाची तात्काळ चौकशीचे आदेश दिले. पण कोर्टाने आदेश देऊन ६ महिने झाले तरी देखील अद्याप चौकशी सुरू झाली नाही. त्यामुळे या बनावटगिरीचा भांडाफोड झाल्यास अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे.