उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन
पुणे : राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत असून या योजनेला विरोध करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालायने या याचिकेवर आक्षेप घेत ही याचिका फेटाळून लावली. दुसरीकडे राज्य सरकारमधील सर्वच मंत्री या योजनेची माहिती गावखेड्यापर्यंत पोहोचवताना दिसून येतात. राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री देखील लाडकी बहीण योजनेची माहिती सातत्याने भाषणातून देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज भरुन घेताना नीट वागा, इथं पक्ष आणू नका. लोकसभेला जिने मतदान केलं नाही, त्यांचाही अर्ज भरून घ्या, असे अजित पवार म्हणाले.
महिला भगिंनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने ४६ हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती देत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या आहेत. तसेच, लोकसभा निवडणुकीत आपल्याला मतदान केलं नसेल, त्या महिला भगिनींनाही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरु द्या, अशा सूचना अजित पवारांनी केल्या आहेत. ”लाडकी बहीण चुनावी जुमला म्हणून सांगितले, पण अशा योजना वेगवेगळ्या राज्यात राबिवल्या जातात. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे कालांतराने वाढवले. सरकारला गरीब जनतेला मदत करायची आहे. पण त्यात लोकांची काही फसवणूक करू नका, कोणतीही योजना आणल्यावर काही त्रुटी राहतात. जिने आपल्याला लोकसभेला मतदान दिले नसले तरी तिला फॉर्म द्या, इथे पक्ष आणू नका,” असे म्हणत लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अर्ज भरुन घेताना कार्यकर्त्यांना अजित पवारांनी महत्त्वाची सूचना केली आहे.
आचारसंहिता लागेपर्यंत जे कुणी फॉर्म येईल त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे पैसे मिळतील. काहीजण फॉर्म भरणाऱ्यांना तुसड्यासारखं वागवत होते. अरे घरात आई-बहीण आहे का नाही? असं वागायचं असेल तर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी येऊ नका. जर तुमचा मूड नसेल तर मूड नीट होईपर्यंत पब्लिकमध्ये येऊ नका. जर कुणी असं वागले तर मी पक्षातून हकालपट्टी करेल, असा दमही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच, गॅसच्या किमती वाढल्या की महिलांच्या कपाळावर आट्या पडायच्या, आता आम्ही 3 गॅस सिलिंडरचे पैसे खात्यावर टाकणार आहोत. तर, ज्या आई वडिलांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत असेल त्यांच्या मुलींसाठी मोफत उच्च शिक्षणाची योजना आणली. बहिणींना देतात भावांना काय?, वीज बिल भावांनाच आहे ना, उगीच विरोधक कांड्या पिकवतात, असे म्हणत सरकारच्या योजनांवर विरोध करणाऱ्यांनाही अजित पवारांनी टोला लगावला.
आमच्यावर आरोप झाले की हे कारखाने राज्याबाहेर पाठवतात. पण, आता टोयोटा गाडी तयार करण्याचा कारखाना संभाजी नगरला होणार आहे. अनेक उद्योग आम्ही महाराष्ट्र मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय, वाढवण बंदरात लोकांचा विरोध आहे. पण आम्ही त्यांना जास्त मोबदला देणार आहोत. देशात जेवढा जीएसटी जमा होतो, त्यातला १६ टक्के महाराष्ट्रात होतो, अशीही माहिती अजित पवार यांनी आपल्या भाषणातून दिली.